mumbai – राज्यातील मंदिरांच्या विकासासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाने अष्टविनायक मंदिरांचा जीर्णोद्धार आणि आध्यात्मिक पर्यटनविकासाला गती देण्यासाठी 148 कोटींच्या खर्चास मान्यता दिल्यानंतर आता श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिराच्या विकास आराखड्यासाठी नियोजन विभागाकडून 1 हजार 865 कोटी रुपये, आणि श्रीक्षेत्र जोतिबा मंदिर विकास आराखड्यासाठी 260 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळं भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
जोतिबा मंदिरासाठी किती कोटीची मान्यता?
दख्खनचा राजा अशी ओळख असलेला कोल्हापूर येथील जोतिबा देवस्थानचा सर्वांगीण विकासासाठी 60 कोटी खर्चास मान्यता दिली आहे. विकास आराखज्यात जोतिबा मंदिर संवर्धन, दुरूस्ती, श्री जोतिबा डोंगरावर येणाऱ्या पायवाटा सुशोभीकरण, जोतिबा डोंगर कड्यांचे संवर्धन करणे, यमाई मंदिर संवर्धन आणि दुरूस्ती करणे, आदी कामे करण्यात येणार आहेत. 31 मार्च 2027 पर्यंत या विकास आराखड्याची अंमलबजावणी पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय बुधवारी जारी करण्यात आला आहे.

तुळजाभवानी मंदिरासाठी 1 हजार 865 कोटी…
देवीच्या साडेतीन शक्ती पीठांपैकी तुळजाभवानी हे एक शक्तीपीठ मानले जाते. नवरात्रीच्या काळात मंदिरात मोठा उत्सव, आणि भाविकांची गर्दी असते. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून श्री क्षेत्र तुळजाभवानी देवीला विशेष महत्वं आहे. देवीच्या दर्शनासाठी वर्षभर देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. या सर्वांचा विचार करुन तुळजाभवानी मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी 1 हजार 865 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री व नियोजनमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने मंदिरांचा जीर्णोद्धार व विकास आराखड्यास सुधारित मान्यता दिली आहे.