Shivsena – मुंबईत ठाकरे गटाला लागलेली गळती थांबण्याचे कही नाव घेत नाही. एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेनेतून बंड केल्यानंतर ठाकरेंच्या सेनेतून अनेक आमदार, खासदार, माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्येकर्ते यांनी उद्धव ठाकरे यांच्या सेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान, आता ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील कुल्याब्यातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक गणेश सानप, आणि त्यांची वाहिनी माजी नगरसेविका सुजाता सानप यांचा शिंदे गटात प्रवेश केला आहे.
गणेश सानप निवडणूक लढवण्यास होते इच्छुक…
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून गणेश सानप नाराज असल्याची चर्चा होती. तसेंच कुलाबा विधानसभा मतदारसंघातून गणेश सानप हे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. परंतु ही जागा महाविकास आघाडीतील काँग्रेसला देण्यात आली होती. त्यामुळे गणेश सानप हे नाराज होते. तसंच पक्षातही वारंवार डावलले जात असल्याने पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर गणेश सानप हे नाराज होते.

कुलाब्यासारख्या कॉस्मोपोलिटीन भागातून ते नगरसेवक म्हणून निवडून येत होते. पण आता मुंबईतील कुल्याब्यातील महत्वाच्या भागातून सानप कुटुंब यांनी ठाकरे गटाला सोडचिट्ठी दिल्यामुळे ठाकरे गटाची ताकद कमी झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
फोडाफोडीसाठी भाजप शिंदे गटात रस्सीखेच…
दुसरीकडे आगामी पालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून, ठाकरे गटाचे नगरसेवक यांना गळाला लावण्यासाठी आणि त्यांना फोडाफोडीसाठी भाजप आणि शिंदे गटात मोठी रस्सीखेच असल्याचे दिसून येत आहे. आता ठाकरे गटाचे दोन माजी नगरसेवक शिंदेच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे त्यांची ताकद वाढली आहे. गणेश सानप हे २०१२ ते २०१७ या कालावधीत नगरसेवक होते. तर सुजाता सानप या २०१७ ते २०२२ या काळात नगरसेवक होत्या.