मुंबई – २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्या प्रकरणी भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केलेल्या वक्तव्य खूप गंभीर आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. या प्रकरणातला आरोपी डेव्हिड कोलमन हेडली अद्याप फरार आहे. तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करून त्याला मुंबईत आणले आहे. माधव भंडारींना ताब्यात घेऊन त्यांचीही राणासोबत चौकशी करावी. त्यांच्या वक्तव्यानुसार त्यावेळी सरकारमध्ये असलेले अनेक नेते आज भाजपामध्ये आहेत. अजित पवारांसह अनेकजण त्यावेळीही मंत्रिमंडळात होते, आताही मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे अजित पवारांना मंत्रीपदावरून बरखास्त करून त्यांचीही चौकशी करावी. अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केली. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
हिंदीच्या सक्तीमागे मोठे षडयंत्र…
दरम्यान, हिंदीची सक्ती अगोदर गुजरात मध्ये करावी. पहिलीच्या वर्गापासून तीन भाषा सक्तीच्या करणे हे अशास्त्रीय आहे त्याचा भार विद्यार्थ्यांना झेपेल का ? सरकारने याचा काही विचार केलेला नाही. भाषा सल्लागार समितीने या निर्णयाला विरोध केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणी घुमजाव केले आहे. त्यांना सक्ती करण्याची आवड आहे पण त्यांनी हा निर्णय परत घ्यावा ही आमची मागणी कायम आहे. पहिलीपासून हिंदीची सक्ती करणे हे एक मोठे षडयंत्र आहे. मराठी भाषा आणि मराठी संस्कृती संपवण्यासाठीच हिंदी लादली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची मराठी भाषा संपवण्याचा हा डाव आहे. सरसंघचालक गोळवलकर यांच्या बंच ॲाफ थॅाट्स या पुस्तकात जे लिहिले त्याची अंमलबजावणी सरकारकडून सुरु आहे.

हंडाभर भगिणींची पाण्यासाठी वणवण…
सध्या राज्यात पाण्याची गंभीर परिस्थिती आहे. पाणीबाणी स्थिती निर्माण झाली आहे. २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले होते. मात्र २०२५ उजाडले तरी महाराष्ट्र तहानलेलाच आहे. हंडाभर पाण्यासाठी माता भगिणींना पायपीट आणि संघर्ष करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी माता भगिणींना वणवण भटकावे लागत आहे. या योजनेतील भ्रष्टाचार माता भगिणींचे बळी घेत आहे, असा प्रहार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोदी सरकारव केला.