मुंबई : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे महाराराष्ट्रातील पर्यटक कश्मीरमध्ये अडकून पडले आहेत. या पर्यटकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे पाऊल उचलले आहे.देवेंद्र फडणवीस कश्मीरमधील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते.
फडणवीसांच्य निर्देशानंतर उद्या (गुरुवारी) श्रीनगर येथून मुंबईसाठी विशेष विमानाची व्यवस्था झाली असून इंडिगोचे हे विमान महाराष्ट्रातील 83 प्रवाशांना घेऊन मुंबईत येईल. उद्यासाठीच आणखी एक विमानाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न होत असून त्यासाठीच्या प्रवाशांची यादी सुद्धा तयार होते आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे यासाठी संपूर्ण मदत करीत आहेत. या विशेष विमानाचा खर्च राज्य सरकार करणार आहे.

83 Maharashtra Tourists to Return from Kashmir by Special Flight on Thursday
उपमुख्यमंत्री कश्मीरमध्ये दाखल
मुख्यमंत्र्यांनी विशेष विमानाची व्यवस्था केली असताना आज (बुधवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कश्मीरमध्ये दाखल झाले आहेत. प्रवाशांच्या व्यवस्थेची ते पाहणी करत असून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी प्रवाशांना दिले आहे. शिवसेनेकडून देखील कश्मीरमध्ये विशेष पथक दाखल झाले असून ते प्रवाशांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.
मृतांना पाच लाखाची मदत
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्राण गमवावे लागलेल्या महाराष्ट्रातील एकूण 6 जणांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे.तर, जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.
महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी एक विशेष विमान वापरण्यात येणार आहे आणि त्याचा खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.