नवी मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेमध्ये युतीची शक्यता वर्तवली जात आहे. युतीच्या चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पाठले आहे. नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या पक्षातील 13 माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या पक्षात जाहीर प्रवेश केला.
नवी मुंबईतील ठाकरे गटाचे शहर संघटक सोमनाथ वास्कर व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कोमल वास्कर, माजी नगरसेवक रंगनाथ औटी आणि उपशहर संघटक शशिकला रंगनाथ औटी, शहर प्रमुख काशिनाथ पवार, उपजिल्हासंघटक व माजी नगरसेविका भारती कोळी, माजी नगरसेविका मेघाली राऊत, माजी नगरसेवक जितेंद्र कांबळी, माजी नगरसेविकाआरती शिंदे, पदाधिकारी सदाशिव मनगुटकर, माणिक पाटील, चंद्रकांत शेवाळे, हितेश पाटील, शाखा प्रमुख रविंद्र कदम, मंदार सावंत, अलका राजे, अंकुश वैती, तुकाराम काळे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला.

काँग्रेस, राष्ट्रवादीलाही दणका
नवी मुंबई महापालिकेचे माजी उपमहापौर व काँग्रेस पक्षाचे नेते अविनाश लाड, माजी नगरसेविका प्रणाली अविनाश लाड, दापोली नगरपरिषदेचे नगरसेवक अविनाश मोहिते यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेवक वैभव गायकवाड, माजी नगरसेविका दिव्या गायकवाड, माजी नगरसेवक अंकुश सोनावणे, माजी नगरसेविका हेमांगी सोनावणे या यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
गणेश नाईकांना टक्कर
भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यामध्ये विशेष लक्ष घातली आहे. जनता दरबार ते तेथे आयोजित करत आहेत. नाईकांची ताकद ही नवी मुंबईत आहे. महापालिकेत देखील त्यांचे एकहाती वर्चस्व असते. ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षातील माजी नगरसेवकांना एकनाथ शिंदेंनी आपल्यासोबत घेत नाईकांच्या वर्चस्वाला आव्हान दिले आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिंदे विरुद्ध नाईक असा सामना पाहण्यास मिळेल.