पोटात जंत होणे ही एक मोठी समस्या आहे. स्वच्छता, माती, दूषित अन्न आणि दूषित पाण्यातून जंत-कृमींचा प्रसार होण्याचे प्रमाण जास्त आहे. लहान मुलांप्रमाणे प्रौढ व्यक्तींमध्येही कृमीचा त्रास होत असतो. जंत हे आतड्यात राहून त्यांची संख्या वाढवतात आणि आपल्या शरीरातील आहाररस, महत्वाची पोषकद्रव्ये, खनिजतत्वे, व्हिटॅमिन्स शोषून घेतात. परिणामी जंतामुळे ऍनिमिया (रक्तक्षय), जीवनसत्त्वाचा अभाव, कुपोषण व रोगप्रतिकार शक्ती कमी होण्याची समस्या निर्माण होते. कृमींमुळे मुलांची बौद्धिक व शारीरिक वाढ खुटते व त्यामुळे कृमी व जंताच्या त्रासाकडे दुर्लक्ष न करता त्यावर वेळीच उपाय केले पाहिजेत. जर तुमच्या मुलांनाही वारंवार पोटाच्या समस्यांमुळे त्रास होत असेल तर पोटातील जंत त्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही यापासून सुटका करू शकता.
पोटात जंत झाल्याची लक्षणे
- पोटात दुखणे,
- जुलाब, उलटी व मळमळ होणे,
- पोट साफ न होणे,
- भूक मंदावणे,
- अशक्तपणा येणे,
- वजन कमी होणे,
- अंगावर आणि चेहऱ्यावर पुरळ, पांढरे चट्टे येणे,
- संपूर्ण शरीराची खाज होणे,
- शौचातून रक्त पडणे व शौचातून जंत पडणे.
पोटात जंत झाले असल्यास ‘हे’ करा घरगुती उपाय
ओवा
दिवासातून दोन वेळा अर्धा चमचा ओवा खाल्यामुळे पोटातील जंत नष्ट होण्यास मदत होते.

वावडिंग
आयुर्वेदानुसार विडंग किंवा वावडिंग हे उत्तम कृमिनाशक आहे. कृमीचा त्रास असल्यास विडंग असणारी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता. याशिवाय पाव चमचा ओवा आणि चमचा वावडिंग एकत्र करून चावून खाल्याने जंत कमी होण्यास मदत होते.
कडुनिंबाची पाने
कडुनिंबाची पाने बारीक वाटून त्यात मध घालून उपाशीपोटी खावे. कडुनिंब अँटीबायोटिक गुणांचे असून यामुळे पोटातील कृमी कमी होण्यास मदत होते.
लसूण
कृमीचा त्रास असल्यास आहारात लसूणचा वापर करावा. सैंधव मीठ घालून लसूणची चटणी तयार करून खावी. यामुळेही कृमी कमी होतात.
हळद
रोज सकाळी पाव चमचा हळद, पाव चमचा वावडिंग एकत्रित करून 2 महिने घेतल्यास पोटातील जंत कमी होतील.
लवंग किंवा दालचिनी
वारंवार जंत होण्याची समस्या असल्यास जेवणानंतर एक-दोन लवंग किंवा दालचिनीचा छोटा तुकडा चावून खावा.
योग्य आहार
आहारात गाजर, कच्ची पपई, डाळिंब, लसूण, भोपळ्याच्या बिया, कारल्याचा रस, हळद यांचा समावेश करावा यामुळे कृमी कमी होण्यास मदत होते.
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)