मुंबई : जर तुम्ही मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा. नाहीतर तुम्ही येथे अडकून पडण्याची शक्यता आहे. 12 एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रायगड दौरा आहे. यानिमित्ताने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी अवजड आणि मोठ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. याबाबत तसा रायगड जिल्हा प्रशासनाकडून आदेश जारी करण्यात आला आहे.
…म्हणून निर्णय घेतला
दरम्यान, रायगडावर दोन दिवस शिवपुण्यतिथी कार्यक्रम करण्यात येणार आहे. या दिवशी रायगडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राज्यातील मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं 12 एप्रिल रोजी किल्ले रायगडावर जाण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी होणार आहे. परिणामी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून या दिवशी जड-अवजड आणि मोठ्या वाहनांस मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक बंदीचे आदेश रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी काढला आहे.

वाहतूक बंदी कधीपर्यंत?
12 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची 345वी पुण्यतिथी आहे. यावेळी किल्ले रायगडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्यातील मंत्री आणि हजारो शिवभक्त या दिवशी छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी वाहनाने येत असतात. यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा ते कशेडीपर्यंत जड-अवजड वाहनांमुळे जागोजागी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून निर्णय घेण्यात आला आहे.