मुंबई: राज्यात एकिकडे ऊन्हाचा तडाखा वाढलेला असताना काही ठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या 15 दिवसांत वेगवेगळ्या भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीतील कांदा, द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालं आहे. आधीच अडचणीत असणारा शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांत हे नुकसानाचं प्रमाण अधिक आहे.
आंबा, द्राक्षे बागांचं मोठं नुकसान
गेल्या काही दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळीमुळे पुणे, धाराशिव, सातारा, सांगली, नांदेड जिल्ह्यातील आंबा आणि द्राक्षे बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 100 हेक्टरवरील पिकांच नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने भाजीपाला, गहू यांसह फळबागांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या भागात कृषी विभाग लवकरच पंचनामे सुरू करणार आहे.

तिकडे सांगली जिल्ह्यात द्राक्ष बागांचा हंगाम जवळपास साठ टक्के संपला आहे. द्राक्षांना अवकाळी पावासाचा फटका बसला आहे. ज्या शेतकऱ्यांनी द्राक्ष्यांची छाटणी उशिरा केली, त्यांच्या बागा अवकाळी पावसात सापडल्या आहेत, सध्या काढणी सुरू असलेल्या कांदा, गहृू आणि कोथिंबीरीसह इतर पालेभाजी आणि फळभाजीला या पावसामुळे फटका बसला आहे.
बळीराजा दुहेरी संकटात, मदतीची आस
एकीकडे कांदा उत्पादक शेतकरी पिकाला दर नसल्यामुळे अडचणीत सापडलेला असताना कांदा पिकाचं शेतात पावसामुळे नुकसान झालं. शिवाय साठवलेल्या कांद्याचही नुकसान झालं. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
बऱ्याच ठिकाणी मशागतीच्या काळात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. पिकांच्या नुकसानीचा आढाव काही ठिकाणी कृषी विभागाकडून घेतला जात असला तरी त्याला अद्याप व्यापक स्वरूप आलेले नाही. जेव्हा हे पंचनामे पूर्ण होतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने नुकसानीचे खरे आकडे आणि क्षेत्र समोर येईल. हे पंचनामे तात्काळ पूर्ण केले जावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होताना दिसत आहे. बागयती क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.