मुंबई – पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते. हे चित्र सर्रास आता मुंबईकरांना सवयीचे झाले आहे. मात्र आता पावसाळ्यात गाळामुळं पाणी साचू नये, किंवा पाणी तुंबू नये यासाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून, पावसाळापूर्वी मुंबईतील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरु आहेत. नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांसाठी प्रशासनाने छायाचित्रण समवेत ३० सेकंदाचे चित्रीकरण (व्हिडिओ) बंधनकारक केले आहे. तर लहान नाल्यांमधून गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. गाळ काढण्याची कामे योग्यरित्या होण्यासह त्यावर देखरेख करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने कंत्राटांमध्ये यंदा अधिक सक्त अटी व शर्तींचा समावेश केला आहे.
संकेतस्थळावर छायाचित्र /व्हिडिओ उपलब्ध…
दरम्यान, जिथून गाळ काढला आहे, तिथून फोटो, व्हीडिओ काढण्याचे पालिकेने अनिवार्य केले आहे. महानगरपालिकेने नागरिकांसाठी ‘https://swd.mcgm.gov.in/wms2025’ या संकेतस्थळावर छायाचित्र /व्हिडिओ उपलब्ध करून दिली आहेत. जेणेकरून नागरिकांना त्यांच्या परिसरातील नाल्याच्या स्वच्छतेचे तपशील पाहता येतील. तसेच गाळ उपसा संदर्भात प्राप्त होणाऱ्या सर्व व्हिडिओंचे महानगरपालिका प्रशासनाकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) प्रणालीच्या मदतीने विश्लेषण केले जाणार आहे. त्याद्वारे नाल्यातून गाळ उपसा करण्याच्या कामांची योग्य देखरेख करणे, कामांमध्ये संपूर्ण पारदर्शकता राखणे यासाठी प्रशासनाला मदत होणार आहे.

पावसाळ्यापूर्वी ८० टक्के गाळ काढण्यात येईल…
मुंबईत नाल्यांमधून गाळ काढल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा जलद होतो. प्रत्येक वर्षी नाल्यांमधून किती गाळ काढणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करून उद्दिष्ट निश्चित केले जाते. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महानगरपालिका पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या माध्यमातून मोठ्या नाल्यांमधील गाळ काढते, तर लहान नाल्यांमधील गाळ काढण्याची जबाबदारी विभागीय कार्यालयांवर (वॉर्ड) असते. पावसाळ्यादरम्यान १० टक्के आणि पावसाळ्यानंतर उर्वरित १० टक्के गाळ काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे काम सुयोग्य नियोजन आखून आणि जास्तीत जास्त पारदर्शकतेने करण्यासाठी महानगरपालिकेने उपाययोजना केल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी सर्वाधिक गाळ उपसा केला जातो. या प्रचलित पद्धतीनुसार, यावर्षी एप्रिल व मे २०२५ या दोन महिन्यांत नाल्यांमधील एकूण गाळाच्या ८० टक्के गाळ काढण्यात येईल. असं पालिका प्रशासनाने म्हटलं आहे.
मुंबईकर नागरिकांना आपल्या परिसरातील नाल्याची स्वच्छता केली जात आहे की नाही, याबाबतची छायाचित्रे, चलचित्रे दररोज अद्ययावत स्थितीमध्ये महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर पाहता येतील.
- नागरिकांना घरबसल्या माहिती उपलब्ध
- गाळनिर्मूलन कार्यामध्ये पुढील घटकांचा समावेश
- नाल्यांमधून गाळ उपसून तो नाल्याच्या काठावर ४८ तास वाळवणे, त्यानंतर वाहतूक करणे
- वाहतूक: वाहनामध्ये गाळ भरून नामनिर्दिष्ट वजन काट्यावर तौलणी करणे आणि त्यानंतर तो निर्दिष्ट विल्हेवाट स्थळी पोहोचवणे.
- विल्हेवाट: निर्दिष्ट विल्हेवाट स्थळी वाहन रिकामे करून, रिकाम्या वाहनाचे पुन्हा वजन काट्यावर वजन करणे.
- वजन व्यवस्थापन प्रणालीची वैशिष्ट्ये आहेत. यात तुम्ही आपल्या परिसरातील नाल्याची स्वच्छता केली जात आहे की नाही हे पाहू शकता.