मुंबई – सध्या सूर्य आग ओकतोय. उन्हाचा प्रचंड कडाका आहे. वातावरणातील तापमानाचा पारा वाढल्यामुळे सर्वत्र उकाडा आणि गर्मी जाणवत आहे. यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. वाढलेल्या गर्मीमुळे नागरिक थंडावा आणि दिलासा म्हणून थंड पेय, थंड पाणी यांचा आसरा घेताना दिसतात. उन्हाळ्यात राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात घट होत आहे. तर दुसरीकडे राज्यातील अनेक भागात पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. अजून पावसाला दोन ते तीन महिने बाकी असताना मुंबई शहरात पाणीबाणी परिस्थिती सुरू झाली आहे. आधीच पाणीटंचाई असताना मुंबईतील टँकर चालकांनी संप पुकारला आहे. आज सलग तिसऱ्या दिवशीही मुंबईतील टँकर चालकांचा संप सुरु आहे. त्यामुळे अनेक कार्यालय, गृहनिर्माण सोसायटी आणि बांधकामाना फटका बसला असून, अनेक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम वर्क करण्याची वेळ आली आहे.
संपाचे कारण काय?
दरम्यान, मुंबईतील बोअरवेल आणि उपसा यामधील पाण्याचा मोठ्या प्रमाणत उपसा झाला आहे. परिणामी भूजल पातळी घटली असल्याचे कारण देत मुंबई महापालिकेने विहिरी आणि बोअरवेल मालकांना काही दिवसांपूर्वीच नोटिसा बजावल्यात. दरम्यान, यानंतर विहिरी आणि बोअरवेल यांनी पाण्याचा उपसा आणि पाण्याच्या विक्रीसाठी केंद्रीय भूजल प्राधिकरणाची परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे म्हटले होते. त्यामुळे विहिरी आणि बोअरवेल मालकांचे या व्यवसायात बक्कळ पैसा कमावणाऱ्या टँकर मालकांनी कडक भूमिका घेतली आहे. म्हणून टँकर मालकांनी 10 एप्रिलपासून मुंबईत बेमुदत संप पुकारला आहे. आज संपाचा तिसरा दिवस आहे.

पाण्यामुळं सर्वाचे हाल…
दुसरीकडे केंद्रीय मंत्री, संबधित अधिकारी आणि टँकर मालकांच्या संघटना यांच्यासोबत (11 एप्रिल, शुक्रवारी) बीकेसी येथे बैठक पार पडलेली. या बैठकीत कोणताही समाधानकारक तोडगा न निघाल्याने सलग तिसऱ्या दिवशीसुद्धा टँकर चालकांनी आपला संप सुरूच ठेवला आहे. पण यामुळं पाण्याविना अनेकांचे हाल होताना पाहयाला मिळत आहे. मुंबईतील इमारत बांधकामे, मेट्रो रेल्वे कामे, हॉटेल्स आदींवर परिणाम होत आहे. तर पाण्याअभावी कर्मचाऱ्यांवर वर्क फ्रार्म करण्याची वेळ आली आहे. केंद्रीय भू-जल प्राधिकरणाचे बदललेले नियम व त्यापार्श्वभूमीवर मुंबईत सुरू असलेला टँकरचालकांचा संप व त्यांच्या मागण्या यातून मध्यम मार्ग काढावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत, तर मुंबईतील विहीर मालकांना मुंबई महापालिकेकडून बजावण्यात आलेल्या नोटिशीला 15 जूनपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. पण पाण्याविना तिसऱ्या दिवशीही मुंबईकरांचे हाल होताहेत.