Cyclone Shakti: बंगाल उपसागराच्या दक्षिणेकडील ठराविक भागांमध्ये, तसेच अंदमान समुद्राच्या दक्षिणेकडील भागात, अंदमान आणि निकोबार बेटे याठिकाणी नैऋत्य मान्सूनचे आगमन झाले आहे. गेल्या काही दिवसांत अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरु झाला आहे.
दरम्यान आता मोठ्या चक्रीवादळाची शक्यता वर्तवली जात आहे. बंगालच्या उपसागरात मोठं चक्रीवादळ तयार होत असल्याचं सांगितलं जात आहे. येत्या २३ मे ते २८ मे दरम्यान हे चक्रीवादळ येणार असल्याची शक्यता आहे.

‘शक्ती’ चक्रीवादळाची शक्यता-
या संभाव्य चक्रीवादळाला ‘शक्ती’ हे नाव देण्यात आले आहे. तसेच येत्या १६ मे ते १८ मे दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हवामान खात्याने १६ मेपर्यंत कर्नाटकात येलो अलर्ट जारी केला आहे.
यादरम्यान कर्नाटकातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच कोलकत्यामध्ये सायंकाळच्या वेळी विजांच्या गडगडाटासह हलकासा पाऊस होण्याचीही शक्यता आहे.
याठिकाणी होणार मध्यम पाऊस-
हवामान विभागाच्या अंदाजानुसार १३ आणि १४ मे दरम्यान गोवा, मध्य महाराष्ट्र, छत्तीसगड, मराठवाडा, गुजरात, सिक्कीम, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, कर्नाटकातील अंतर्गत भाग, कोकण याठिकणी हलकासा पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.