जळगाव- जागतिक मंदिच्या भीतीच्या वातावरणात सोन्याचे दर उच्चांक गाठताना दिसतायेत. सुवर्णनगरी अशी ओळख असलेल्या जळगावात सोन्यानं आज नवा उच्चांतक प्रस्थापित केलाय. सोनं पहिल्यांदाच 94 हजारांच्या पुढं गेलंय. सोन्याच्या आजच्या दरात पुन्हा हजार रुपयांनी वाढ नोंदवली गेली आहे.
सोन्याचे आजचे दर 97 हजार रुपये प्रती तोळा असे नोंदवण्यात आलेत. तर चांदीच्या दरातही 1 हजार रुपयांची वाढ झालीय. चांदीचा आजचा दर 1 लाख रुपये प्रतिकिलो इतका जळगावात नोंदवण्यात आलाय.

लग्नसराईमुळे भारतात मागणी वाढली
जागतिक पातळीवर अमेरिका आणि चीनमध्ये टेरिफवरुन व्यापार युद्ध भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठांत त्याचे परिणाम पाहायला मिळतायेत. अशा स्थितीत सोन्यासारख्या विश्वासाच्या गुंतवणुकीकडे कल वाढताना दिसतोय. त्यामुळे सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेले आहेत.
त्यातच भारतात लग्नसराई सुरु झाली आहे. लग्नसराईच्या काळात देशात सोन्याला जास्त मागणी असते. मागणी वाढल्यानेही दरावर परिणाम झाल्याचं सोन्याचे व्यापारी सांगतायेत. मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरु अशा शहरांत लग्नसराईच्या काळात सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्यानं सोनं येत्या दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत कमी होत असल्यामुळेही सोन्याचे दर वाढत असल्याचं सांगण्यात येतंय. या वर्षभरात भारतीय रुपया चार टक्क्यांनी घसरला आहे. त्याचा परिणामही सोन्यावर झाल्याचं सांगण्यात येतंय.
वर्षभरात सोनं 20 हजारांनी महागलं
या वर्षात 1 जानेवारीपासून विचार केला तर सोन्याचे दर 20 हजारांनी वाढले आहेत. 24 कॅरेट सोना प्रतितोळा 1 जानेवारीला 76,162 रुपये होतं, त्यात वाढ होऊन त्याची किंमत 97 हजारांवर पोहचली आहे. तर चांदीचे भाव 86,017 वरुन एका लाखापर्यंत पोहचले आहेत.
वर्षाखेरीस पर्यंत 1 लाख 10 हजारांच्या वर जाणार सोनं
अमेरिका आणि चीनमध्ये सुरु झालेल्या व्यापार युद्धामुळं जागतिक मंदी येण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केल्यास डिसेंबर अखेरपर्यंत भारतातील सोन्याचे दर प्रतितोळा 1 लाख 10 हजारांपेक्षा जास्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. सद्यस्थितीत सोनं खरेदी करायचं असल्याचं सर्टिफाईड सोनंच खरेदी करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतायेत. भविष्यात सोन्याचे दर आणखीही नवे उच्चांक मोडतील असंही सांगण्यात येतंय.