मुंबई: समृध्दी महामार्गाच्या इगतपुरी ते ठाण्यातील आमने या शेवटच्या टप्प्याची कामे पूर्ण झाली आहेत. आता या रस्त्याच्या उद्घाटनासाठी राज्य सरकारकडे एमएसआरडीसीने वेळ मागितली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मे महिन्याच्या सुरूवातीलाच या रस्त्याचे उद्घाटन करू पाहत आहे. त्यामुळे आता नागपूर ते मुंबई असा थेट प्रवास करता येणार आहे.
इगतपुरी ते आमने 76 किमीचा टप्पा
समृध्दी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा 520 किमीचा टप्पा डिसेंबर 2022 मध्ये खुला करण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्यात शिर्डी ते भरवीर असा जवळपास 80 किमीचा टप्पा वाहतूकीसाठी खूला केला गेला होता. पुढे 2024 मध्ये भरवीर ते इगतपुरी 23 किमीचा टप्पा वाहतूकीसाठी खूला झाला. आता इगतपुरी ते आमने हा चौथा आणि शेवटचा टप्पा वाहतूकीसाठी खुला होणार आहे. जवळपास 76 किमी लांबीचा हा टप्पा असणार आहे.

यामुळे ठाण्यातील आमने ते नागपूर प्रवास सुखकर होणार आहे. असे असेल तरी तूर्त मुंबई ते आमने हा प्रवास मात्र अडथळ्यांचाच राहणार आहे. कारण या भागात रस्त्याचे काम अद्यापही सुरू आहे. आणि या भागातील काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे.
चौथ्या टप्प्याचं उद्घाटन कधी?
समृध्दी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने राज्य सरकारकडे वेळ मागितली आहे. असे असले तरी सद्यस्थितील वडपे येथील नाशिक हायवेला जोडण्यासाठी कनेक्टरचे काम सध्या सुरू आहे. ते काम पूर्ण होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागू शकते, आता तोपर्यंत वाट पाहिली जाणार नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे,त्यामुळे मे महिन्यात या टप्प्याचं उद्घाटन होण्याची शक्यता अधिक आहे.
समृध्दीचा शेवटचा टप्पा खुला झाल्यानंतर नागपूरहून निघालेल्या वाहनांना थेट मुंबईच्या वेशीवर पोहोचणे शक्य होणार आहे. तसेच हा संपूर्ण 701 किमीचा महामार्ग नागरिकांच्या सेवेत दाखल होईल. विधानसभा निवडणुकीपूर्वीच हा इगतपुरी ते आमने हा शेवटचा टप्पा खुला केला जाणार होता, अशी माहिती समोर येत आहे. मात्र या भागातील खर्डी येथील पुलाचे काम अर्धवट राहिले होते, परिणामी हा मार्ग त्यावेळी खुला करणे शक्य झाले नाही. तसेच आमने येथून वडपेकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम देखील अपूर्ण होते. फेब्रुवारीपर्यंत हा रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्याचे नियोजन एमएसआरडीसीने केले होते. नाशिक कनेक्टरचे काम अपूर्ण असल्याने पुन्हा नियोजन रखडले, आता तरी हा मार्ग तात्काळ खुला होणार, की नाशिक कनेक्टरचे काम पूर्ण होण्याची वाट बघितली जाणार हे महत्वाचं.