ठाणे – उन्हाळा वाढतोय तसतशा पाणीटंचाईच्या झळाही राज्याला जामवू लागल्या आहेत. मुंबई, ठाणे, पुणे अशा महानगरांतही पाणी टंचाईचं संकट जामवू लागलं आहे. मुंबईत टँकरचालकांच्या संपामुळं काही मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. ठाकरेंची शिवसेनाही याप्रश्नी आक्रमक झालीय. तर दुसरीकडं स्मार्ट सिटी अशी ओळख असलेल्या ठाणे शहरालाही पाणीटंचाईच्या झळा जामवू लागल्या आहेत.
ठाणे शहराची लोकसंख्या गेल्या काही दिवसांत झपाट्यानं वाढलीय. सध्या या शहराची लोकसंख्या 25 लाखांच्या घरात आहे, त्या तुलनेत होणारा पाणीपुरवठा कमी आहे. काही भागात टँकरनं पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. अशा स्थितीत ठाणेकरांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन ठाणे महापालिकेकडून करण्यात येतंय. पाणी वाचवण्यासाठी ठाणे शहरातील नागरिकांसाठी काही सूचना ठाणे मनपानं केलेल्या आहेत.

ठाणे महापालिकेच्या पाणी बचतीसाठी सूचना
1. अंघोळीसाठी शॉवरचा वापर करु नका
2. नळ सुरु ठेवून भांडी, कपडे धुवू नका
3. आठवड्यातून एकदाच कपडे धुवा
4. धुतलेल्या कपड्यांचे पाणी बागेसाठी वापरा
5. घरातील नळांची तपासणी करा, लिकेज काढून टाका
5. स्विमिंग टँकसाठी पिण्याचे पाणी वापरु नका
6. गाड्या धुवू नका, त्याऐवजी ओल्या कापड्याने पुसा
7. सोसायटीची टाकी ओव्हर फ्लो होणार नाही, याकडे लक्ष ठेवा
8. सोसायटीची टाकी ओव्हर फ्लो झाली तर पाणी कनेक्शन तोडण्याचा इशारा
अशा काही सूचना ठाणे महापालिकेनं नागरिकांना केल्या आहेत. ठाण्यातील रहिवाशांना मात्र या सूचना न वाटता फतवा असल्याचं वाटतंय.
ठाण्याला कुठून होतो पाणी पुरवठा?
स्टेम, एमआयडीसी आणि मुंबई महापालिकेकेडून ठाणे शहराला दररोज 585 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करण्यात येतो. उन्हाळ्यात पाणी कमी पडतंय. धरणं, विहरी आणि बोअरवेलचं पाणीही अटण्यास सुरुवात झालीय. अशा स्थितीत ठाणेकरांना या परिस्थितीचं भान यावं यासाठी कठोर पावलं उचलण्यास ठाणे महापालिकेनं सुरुवात केलीय. पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन करण्यात येतंय. ठाणेकरांनाच नाही तर संपूर्ण राज्यातील रहिवाशांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करण्याची गरज आहे.