अमरावती-मुंबई प्रवास आता करा विमानातून, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अमरावती विमानतळाचं उद्घाटन

1992 पासून विमानतळाची असलेली अमरावतीकरांची प्रतीक्षा अखेर संपली. अमरावती विमानतळाचं उद्घाटन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. पश्चिम विदर्भाच्या विकासासाठी हे विमानतळ नवं उड्डाण छरेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

अमरावती – पश्चिम विदर्भाच्या विकासपर्वाला वेग देणाऱ्या अमरावती विमानतळाचं उद्घाटन आज पार पडलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री के राममोहन रेड्डी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हेही यावेळी उपस्थित होते. आजपासून मुंबई ते अमरावती अशी विमानसेवा सुरु होणार आहे. आठवड्यातून 3 वेळा 72 सीटर विमान अमरावती-मुंबईत विमानसेवा पुरवणार आहे. या विमानतळामुळं संतभूमी असलेल्या पश्चिम विदर्भाच्या विकासाला गती येईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलाय. नवी मुंबई विमानतळही लवकरच सुरु होईल, असंही यावेळी महायुतीच्या नेत्यांनी सांगितलं.

फडणवीस यांच्या 2014 सरकारच्या काळात या विमानतळाचं काम सुरु झालं होतं. मात्र मविआ सरकारच्या काळात या विमानतळाचं काम ठप्प झालं होतं. 2022 साली महायुती सरकार आल्यानंतर पुन्हा हे काम सुरु झालं. एमआयडीसीनं हे काम विक्रमी वेळेत पूर्ण केल्याचं कौतुकही यावेळी मान्यवरांनी केलंय.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

अमरावती आईचं माहेर आहे, त्यामुळे अमरावतीत काहीही चांगलं झालं की तिला आनंद होतो. तिला आनंद देण्याचं काम आम्ही करतोय, असं मुख्यमंत्री म्हणालेत. आईच्या रुपानं अमरावतीचं माझ्यावर ऋण आहे ते कायम राहावं असंही फडणवीस म्हणालेत. पायलट ट्रेनिंग स्कूल अमरावतीत सुरु होणार आहे, त्यातून 180 पायलट दरवर्षी तयार होतील. असंही फडणवीस म्हणाले. या केंद्रामुळे आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचंही ते म्हणाले. दक्षिण पूर्व आशियातील सर्वात मोठं पायलट प्रशिक्षण केंद्र अमरावतीत होत असल्याचं त्यांनी सांगितलंय. अमरावतीत टेक्सटाईल पार्कही उभा राहतोय, त्यातून दोन लाख रोजगार उपलब्ध होतील, असं मुख्यमंत्री म्हणालेत. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या टेक्स्टटाईल पार्कचा फायदा होईल, असंही मुख्यमंत्री म्हणालेत. दावोसमध्ये 7 लाख कोटींचे करार हे विदर्भासाठी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय. वैनगंगा-नळगंगा प्रक्ल्पामुळे विदर्भातील सात जिल्ह्यांचा चेहरामोहरा बदलणार असल्याचं सांगत यावर्षी त्याचं काम सुरु होणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणालेत. विदर्भ कायमचा दुष्काळमुक्त होईल, अशी ग्वाहीही यावेळी त्यांनी दिली. यवतमाळ, अकोला विमानतळाचाही विस्तार करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत.

अमरावतीत वैद्यकीय महाविद्यालयापाठोपाठ आयटी पार्कची निर्मितीही करण्यात येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. अमरावती विमानतळाचं भविष्यात विस्तारीकरण करण्याची योजना असल्याचंही फडणवीस म्हणालेत. विमानतळाची धावपट्टी 3000 फूट करण्यासाठी आगामी काळात प्रयत्न होतील असं ते म्हणालेत.

मोदींच्या कार्यकाळात हवाई विभागाचा विस्तार

2014 साली पंतप्रधान मोदी सत्तेत आले तेव्हा 74 विमातळं होती आता त्यांची संख्या 159 झाली आहेत. सध्या देशात 220 दशलक्ष विमान प्रवासी असल्याचंही रेड्डी यांनी सांगितलंय. कोल्हापूर, जळगाव, नाशिक, गोंदिया, सिंधुदुर्ग अशा ग्रामीण भागात विमातळं सुरु केली आहेत. महाराष्ट्रातील 160 रुट निश्चित केले आहेत, त्यापैकी 105 मार्ग सुरु केले आहेत. गेल्या पाच वर्षांत विमानतळावरील प्रवाशी संख्येत 40 टक्के वाढ झालीय. सध्या देशात 800 विमानं आहेत, आगामी काळात 1700 विमानं येणार आहेत. आगामी काळात 30 हजार नव्या पायलटस तयार होणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलंय. अमरावतीत पायलट प्रशिक्षणाचं केंद्र सुरु होणार आहे, 34 विमानांसह हे केंद्र लवकरच सुरु होईल असंही रेड्डी म्हणालेत.

वॉटर कॅननची सलामी नव्या विकासपर्वाला सुरुवात !

केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री हे विमानानं अमरावती विमानतळावर दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अलायन्स एअर कंपनीच्या 9I633 विमानाचे नवनिर्मित अमरावती विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी अमरावती विमानतळावर आगमन झालेल्या पहिल्या प्रवासी विमानाला शानदार वॉटर कॅनन सलामी देण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीष महाजन आणि संबंधित अधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.


About Author

Smita Gangurde

Other Latest News