वक्फ सुधारणा कायद्यावरुन पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार; आंदोलकांकडून दगडफेक, गाड्या जाळल्या

मुर्शिदाबाद : वक्फ सुधारणा कायदा लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाला असला तरी हा मुद्दा आता सुप्रीम कोर्टात गेला आहे. दुसरीकडे देशात आता या कायद्यानंतर पडसाद उमटण्यास सुरुवात झालेली दिसतेय. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये नव्या वक्फ कायद्याच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात हिंसाचार झाला आहे.

हिंसाचारात आंदोलकांनी अनेक गाड्यांची जाळपोळ केली, त्यात काही पोलिसांच्या गाड्यांचाही समावेश आहे. मुर्शिदाबादमध्ये आंदोलकांकडून दगडफेकही करण्यात आली. आंदोलक आणि पोलिसांत झालेल्या चकमकीत अनेक पोलीस जखमी झाल्याचीही माहिती आहे.

जम्मू काश्मीर विधानसभेतही पडसाद

जम्मू काश्मीरच्या विधानसभेत सलग दुसऱ्या दिवशी वक्फ सुधारणा कायद्यावरुन गदारोळ झाला. नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांनी सभागृहात विधेयकाबाबत चर्चेची मागणी केली. यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली. तणाव निर्माण झाल्यानंतर भाजपा आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांत धक्काबुक्कीची घटनाही घडली. सोमवारी एनसीच्या एका आमदारानं वक्फ सुधारणा कायद्याची प्रत फाडून टाकली होती. तर एका आमदारानं आपलं जॅकेट फाडलं होतं. त्यानंतर सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

वक्फ कायद्यावरुन देशात वातावरण तापण्याची शक्यता

वक्फ सुधारणा विधेयक 2 एप्रिलला लोकसभेत तर 3 एप्रिलला राज्यसभेत मंजूर करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी या विधेयकाला 5 एप्रिलला रात्री मंजुरी दिली. सरकारच्या वतीनं नव्या कायद्यासाठी गॅझेट अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. दुसरीकडे या नव्या कायद्याच्या विरोधात 11 याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या आहेत. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल बोर्डानं 11 एप्रिलपासून संपूर्ण देशात विरोधी आंदोलनाची घोषणा केली आहे.


About Author

Smita Gangurde

Other Latest News