वर्धा : वर्धा जिल्ह्यात पोलीस कर्मचारी असलेल्या प्रशांत वैद्य यांच्यासाठी सोमवारची रात्र ही काळरात्र ठरली. मध्यरात्री तरोड्यातून वर्ध्याच्या दिशेनं कारमधून कुटुंबासह येण्याचा निर्णय त्यांच्या जीवावर बेतलाय. या एका निर्णयानं क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. वैद्य यांच्या कारला झालेल्या अपघातात प्रशांत वैद्य, त्यांची पत्नी प्रियंका वैद्य, आठ वर्षांचा मुलगा प्रियांश आणि तीन वर्षांची लहानगी माही या सगळ्यांना जीव गमवावे लागले आहेत. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरू झालं, मात्र चारही जणांचे जीव गेल्यानं वर्धा जिल्ह्यात हळहळ व्यक्त होतेय.
नेमका कसा घडला अपघात
प्रशांत वैद्य हे सोमवारी रात्री आपल्या परिवारासोबत कारने तिरोड्याहून वर्ध्याकडे येत होते. कार भरधाव वेगात असतानाच, त्यांच्या रस्त्यात डुक्कर आलं. प्रशांत वैद्य अचानक आलेल्या डुकरामुळं गांगरले. त्यांच्या कारची धडक डुकराला बसली आणि त्याचवेळी समोर असलेल्या टँकरलाही कार जाऊन धडकली. डुक्कराला कारची धडक लागल्यानं प्रशांत वैद्य यांचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या टँकरला जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, प्रशांत वैद्य यांची पत्नी आणि आठ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात कार चालवणारे प्रशांत वैद्य आणि त्यांची तीन वर्षांची मुलगी माही गंभीर जखमी झाले होते. त्यांना सेवाग्राम रुग्णालयात पाठविण्यात आले होते, तिथं लहानग्या माहीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर प्रशांत वैद्य यांना जीव वाचवण्यासाठी नागपूरच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र त्यांचा एम्स रुग्णालयात मृत्यू झाला.
पोलीस दलातही हळहळ
प्रशांत वैद्य हे अत्यंत शांत स्वभावाचे होते. त्यांनी पोलीस खात्यात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. प्रशांत वैद्य यांच्या कुटुंबाला झालेल्या अपघातानं त्यांच्यासोबत काम करणारे सहकारीही व्यथीत झालेत. एका अपघातात वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूरचे रहिवासी असलेलं वैद्य कुटुंब पूर्णपणे संपलं.
चौघांची एकत्र अत्यंयात्रा
वैद्य कुटुंबातील चौघांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टेम करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या मूळ गावी मांडगावात अंत्यदर्शनसाठी मृतदेह ठेवण्यात आले. त्यानंतर मृतदेह वर्ध्याच्या स्मशानभूमीत आणले आणि त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच कुटुंबातील चौघाची अंत्ययात्रा ही मन सुन्न करणारी होती. अश्रूपूर्ण वातावरणात वैद्य कुटुंबाला निरोप देण्यात आला.