आयपीएलचे अधिकृत वेळापत्रक जाहीर; 17 मे ते 3 जून रंगणार सामने!

आयपीएल 2025 चे नवे अधिकृत वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले आहे. 6 स्टेडियम आणि 18 दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे. सविस्तर जाणून घेऊ...

भारतातील क्रिकेट प्रेमी आणि आयपीएल रसिकांसाठी मोठी गुड न्यूज समोर आली आहे. आयपीएलचे सामने पुन्हा सुरू होत आहेत. भारत आणि पाक यांच्यातील तणावामुळे काही काळ स्थगिती देण्यात आली होती. भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर आता देशात पुन्हा एकदा आयपीएलचा धडाका सुरू होणार आहे. आयपीएलचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

17 मे पासून 3 जूनपर्यंत धमाका 

आगामी काळात उर्वरित 17 सामने खेळवण्यात येणार आहेत. येत्या 17 मे पासून पु्न्हा एकदा आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना 3 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.  सरकार, सुरक्षा संस्था आणि सर्व भागधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर, बीसीसीआयने 17 मे पासून स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने त्याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

असे असेल वेळापत्रक

17 मे रोजी पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात बंगळुरूमध्ये खेळला जाईल. उर्वरित सामन्यांसाठी जयपूर, बंगळुरू, लखनौ, दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद या सहा शहरातील मैदानांची निवड करण्यात येणार आहे. जाहीर झालेल्या नवीन वेळापत्रकानुसार, प्लेऑफचा टप्पा 29 मे पासून सुरू होईल. पहिला क्वालिफायर सामना 29 मे रोजी खेळवला जाईल. एलिमिनेटर सामना 30 मे रोजी, दुसरा क्वालिफायर सामना 1 जून रोजी आणि फायनल सामना 3 जून रोजी खेळवला जाईल. प्लेऑफ सामन्यांची ठिकाणे नंतर जाहीर केली जातील.

शेवटचा साखळी सामना 27 मे रोजी लखनौच्या स्टेडियमवर आरसीबी आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जाईल. रविवार, 18 मे रोजी दोन सामने खेळले जातील. राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज दिवसाच्या वेळी आणि दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज संध्याकाळच्या सामन्यात आमनेसामने येतील.

दरम्यान आता सामने पुन्हा सुरु होत असल्यानं आयपीएल प्रेमींमध्ये चांगला उत्साह पहायला मिळत आहे. भारत, पाक तणावामुळे आयपीएलला काही काळ ब्रेक लागला होता, त्यानंतर आता उर्वरित सामने पुन्हा सुरू होत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

 


About Author

Rohit Shinde

Other Latest News