नवी दिल्ली- काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या नॅशनल हेराल्ड आणि एसोसिएट्स जर्नल्स लिमिटेडशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी मंगळवारी ईडीनं चार्जशीट दाखल केली. यात सोनिाय गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांच्या नावांचा समावेश आहे.
आरोपपत्रांत सोनिया आणि राहुल गांधी यांच्या नावांचा समावेश केल्यामुळं काँग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीनं देशभारत ईडी कार्यालयांबाहेर आज निदर्शनं करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा धमकावण्यासाठी हे करत असल्याचा आरोपही काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलाय.

या प्रकरणी पुढील सुनावणी 25 एप्रिलला दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टात होणार आहे. कोर्टानं ईडीला या प्रकरणातील केस डायरीची मागणी केली आहे. 2012 साली भाजपाच्या सुब्रमण्यम स्वामी यांमी सोनिया, राहुल आणि या प्रकरणातील सहभागी कंपन्यांशी संबंधित व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली होती.
12 एप्रिल 2025 रोजी चौकशीत या प्रकरणातील संपत्ती जप्त करण्याची कारवाई करण्यात आलीय. लखनौ आणि मुंबईतील 661 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे.
गांधी कुटुंबानं 2 हजार कोटींची संपत्ती 50 लाखांत हडपल्याचा ईडीचा आरोप
एसोसिएटेड जर्नल्स लिमिटेडच्या 2 हजार कोटींच्या संपत्तीचं अधिग्रहण गांधी कुटुंबानं खासगी मालकी असलेल्या यंग इंडियन कंपनीच्या माध्यमातून केवळ 50 लाखांत केलं. असा आरोप ईडीकडून करण्यात आलाय. या कंपनीचे 76 टक्के शेअर्स हे सोनिया आणि राहुल गांधी यांच्याकडे आहेत. या प्रकरणात अपराधातून प्राप्त केलेली संपत्ती 988 कोटी रुपये असल्याचा ईडीचा दावा आहे. सध्या या संपत्तीचं बाजार मूल्य 5 हजार कोटी असल्याचं सांगण्यात येतंय.
रॉबर्ट वाड्रांची दुसऱ्या दुवशी ईडी चौकशी
दुसरीकडे सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियंका गांधींचे पती राँबर्ट वार्डा यांची आज सलग दुसऱ्या दिवशी ईडीकडून चौकशी करण्यात येतेय. गुरुग्राममधील शिकोहपूर जमीन घोटाळा प्रकरणात ही चौकशी सुरु आहे. मंगळवारी वाड्रा यांची या प्रकरणात साडे सहा तास चौकशी करण्यात आली. आज बुधवारी त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे.