Pope Francis dies: नव्या पोपची निवड कशी होते? पांढऱ्या आणि काळ्या धुराचं काय आहे कनेक्शन?

पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर आता पुढील पोप निवडीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

ख्रिश्चन समुदायाचे सर्वात मोठे धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं वयाच्या 88 व्या वर्षी निधन झालं. व्हेटिकन सिटीमध्ये सोमवारी याबाबतची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली. पोप फ्रान्सिस यांना डबल न्युमोनिया आणि किडनीसंदर्भातील त्रास होता. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून ते ऑक्सिजन सपोर्टवर होते.

पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर आता पुढील पोप निवडीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. पोप यांच्या मृत्यूनंतर व्हेटिकन सिटीमध्ये मध्यांतराचा काळ सुरू होतो. हा काळ पोपचा मृत्यू आणि नव्या पोपच्या निवडणुकीदरम्यानचा मानला जातो.

नव्या पोपची निवड कशी होते?

नव्या पोपची निवडणूक कॉन्क्लेव्ह प्रक्रियेतून केली जाते. ही कॅथलिक चर्चची सर्वात गोपनीय आणि प्राचीन परंपरांमधील एक आहे. पोपचा मृत्यू किंवा त्यांनी पद सोडल्यानंतर कॉन्क्लेव्ह सुरू होतो. सर्वसाधारपणे कॉन्क्लेव्ह पोपच्या मृत्यूच्या 15-20 दिवसांच्या आत सुरू होतो. चर्चचे वरिष्ठ अधिकारी एकत्र येत या प्रक्रियेतून नव्या पोपची निवड करतात. यामध्ये 80 वर्षांहून कमी असलेली व्यक्ती कार्डिनल्स मतदानात सहभागी होऊ शकते.

मतदानानंतर मतपत्रिका जाळल्या जातात…

यादरम्यान अनेक टप्प्यात मतदान केलं जातं. जोपर्यंत कोणत्याही उमेदवाराला दोन तृतीयांश बहुमत मिळत नाही आणि प्रत्येक मतपत्रिका जाळल्या जात नाही तोपर्यंत निर्णय होत नाही. याशिवाय काळ्या धुरातून कोणताही निर्णय झाला नसल्याचे संकेत दिले जातात. तर पांढरा धूर हा नव्या पोपची निवड झाल्याचे संकेत आहेत.

नव्या पोपची घोषणा…

नव्या पोपच्या निवडणुकीनंतर त्यांना अधिकृतपणे विचारलं जातं की, ते आपली भूमिका स्वीकारण्यास तयार आहे का? त्यांनी होकार दिल्यानंतर नव्या पोपला एक नाव घ्यावं लागतं. त्यांना प्रेरणादायी ठरलेल्या संतांचं नाव निवडावं लागतं. या नावाने ते पुढे ओळखले जातात. पोप यांना सेंट पीटर बेसिलिकाच्या बाल्कनीत नेण्यापूर्वी त्यांना पोशाख दिला जातो. शेवटी नवे पोप सेंट पीटर स्क्वायरमध्ये आपल्या अनुयायांना अभिवादन करतात आणि पोपच्या रुपात पहिल्यांदा आशीर्वाद देतात.

कॅमरलेंगोकरवी वकेली जाते पोप यांच्या मृत्यूची पुष्टी…

पोप यांच्या मृत्यूची पुष्टी कॅमरलेंगो यांच्या करवी केली जाते. चर्चचे कोषाध्यक्ष म्हणून काम करणारे कार्डिनल औपचारिकपणे पोप यांच्या बपतिस्माचं नाव तीन वेळा उच्चारतात. जर कोणतीही प्रतिक्रिया आली नाही तर त्यांना मृत घोषित केलं जातं. यानंतर व्हेटिकन अधिकृतपणे जगभरात पोपच्या मृत्यूची याची माहिती देतात.

9 दिवसांचा शोक..

पोप यांच्या मृत्यूनंतर नऊ दिवस शोक पाळला जातो. पोप यांच्यावर मृत्यूच्या 4-6 दिवसात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. पोप यांना सेंट पीटर्स बेसिलिकामध्ये दफन केलं जातं.

 

 

 

 

 


About Author

Smita Gangurde

Other Latest News