डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ ‘बॉम्ब’मुळे जागतिक मंदीचं संकट? वाचा सविस्तर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफसंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राबवलेल्या नव्या टेरिफ धोरणाचे परिणाम जागतिक पातळीवर उमटण्यास सुरुवात झालेली आहे. भारत, चीनसह जगातील अनेक देशांवर ट्र्म्प यांनी टेरिफ कर आकारल्यानं त्याचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या या निर्णयावर अनेक देशांकडून टीका करण्यात येत आहे. जागतिक शेअर बाजारात घसरण सुरु झाली असून, भविष्यात काय घडेल याची चिंता अनेकांना सतावत आहे.

जागतिक शेअर बाजारात झालेल्या पडझडीबाबत ट्रम्प मात्र निश्चिंत दिसतायेत. काही काही बाबी ठीक करण्यासाठी ‘औषध’ देण्याची गरज असते, असं मत ट्रम्प यांनी यावर व्यक्त केलंय. ज्या टेरिफ धोरणावरुन वाद झालाय ते धोरण मागे घेणार नाही, असे संकेतही ट्रम्प यांनी दिलेत.

मार्केट क्रॅशनं फरक पडणार नाही- ट्रम्प

जागतिक शेअर बाजारात पुढे काय होणार, हे मला माहीत नाही, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणालेत. अमेरिका सध्या मजबूत स्थितीत असल्याचाही दावा ट्रम्प यांनी केलाय. मार्केट क्रॅशनं मला काहीही फरक पडणार नाही, कारण हे काही काळासाठी आहे, त्यानंतर सर्व व्यवस्थित होईल, असंही ट्रम्प म्हणालेत.

50 पेक्षा जास्त देशांचा नव्या धोरणासाठी संपर्क- ट्रम्प

नव्या टेरिफ धोरणांनंतरही जगातील 50 देशांनी अमेरिकेशी व्यापार करण्याची तयारी दर्शवली आहे, असं ट्रम्प प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात येतंय. या देशांशी चर्चा करुन अंतिम निर्णय होण्यास थोडा कालावधी जाईल असंही सांगण्यात येतंय.

ट्रम्प यांचं धोरण जागतिकीकरणावर आघात

ट्रम्प यांच्या टेरिफ बॉम्बमुळे जगातील अनेक देश नाराज आहे. इंग्लडचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी ट्रम्प यांच्या या नव्या धोरणामुळं जागतिकीकरणाचा काळ संपल्याचं म्हटलंय. ट्र्म्प यांच्या धोरणाचा जगावर परिणाम होणार असून, देशांतर्गत उत्पादन वाढीसाठी आता सगळे देश प्रयत्न करतील असं त्यांनी म्हटलंय. याचा परिणाम जागतिक देवाणघेवाण आणि व्यापारावर होणार आहे.

टेरिफ धोरणाचा जगावर काय परिणाम

अमेरिकेच्या व्यापारातील तोटा भरुन काढण्यासाठी आयातीवर टॅरिफ वाढवणे, परदेशी मालावर शुल्कवाढ, व्यापार करारात बदल अशी पावलं डोनाल्ड ट्रम्प यांनी उचलली आहेत. मात्र याचे परिणाम जगावर होणार आहेत. ट्रम्प यांनी टेरिफ लादल्यानं इतर देशही आता अमेरिकेवर टेरिफ लावण्याच्या तयारीत आहेत. या सगळ्याचा परिणाम व्यापारात मंदी असा होणार आहे, आणि गुंतवणुकीवर होणार आहे. कच्च्या मालाची निर्यात, रोजगार, उद्योग, आयटी कंपन्या, ऑटो, शेती, शेअर बाजार या क्षेत्रांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. विकसनशील देशांच्या निर्यातीवर या टेरिफचा सर्वाधिक परिणाम होणार असून त्यांना मोठा फटका बसेल. अमेरिकेला काही काळ फायदा होणार असला तरी दीर्घकालीन जागतिक मंदीची ही सुरुवात असल्याचं जाणकार सांगतायेत.


About Author

Smita Gangurde

Other Latest News