नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर कडाडून टीका केली. “अमित शाह रायगडवर येऊन शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करतात आणि आम्हालाच त्यांच्याबद्दल शिकवतात. ज्यावेळी शिवाजी महाराजांनी सूरत लुटली होती, तेव्हा त्याची बातमी लंडन गॅझेटमध्ये छापली गेली होती. त्यामुळे आम्हाला शिवरायांबद्दल शिकवू नये,” असा टोला ठाकरेंनी लगावला. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांविरोधात पावले उचलू म्हणणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वेळी गप्प का बसले, असा सवालही त्यांनी केला.
शिवरायांचा फक्त राजकारणासाठी वापर
अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करण्याची घोषणा भाजप सरकारने केली होती. त्यावरून देखील ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला ते म्हणाले, मोदींनी भूमिपूजन केलं पण स्मारकाचं काय झालं? भाजपला खरंच शिवाजी महाराजांबद्दल आदर असेल, तर देशभर शिवजयंतीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी. भाजप फक्त राजकारणासाठी शिवरायांचा वापर करतो, असा आरोपही ठाकरेंनी केला.

भाजपचे हिंदुत्व ढोंगी
भाजपचे हिंदुत्व हे निवडणुकीनुसार बदलते. बिहारमध्ये ‘सौगात ए मोदी’च्या माध्यमातून लाखो मुस्लिमांना भेटी वाटल्या. मग तिथे हिंदुत्व कुठे गेलं? महाराष्ट्रात ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि बिहारमध्ये ‘बाटेंगे तो जितेंगे’ हे भाजपचे धोरण आहे. आम्ही भाजपला सोडले आहे हिंदुत्व नाही, असे ठाकरेंनी ठणकावले.
शिवाजी महाराजांपेक्षा राज्यपाल मोठे नाही
उदयनराजे यांनी राज्यपाल भवनातील 40 एकर जागेमध्ये शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची मागणी केली आहे. त्या मागणीला उद्धव ठाकरेंनी पाठींबा दिला. ते म्हणाले, शिवाजी महाराजांपेक्षा राज्यपलपद महत्त्वाचे नाही. नरेंद्र मोदींना शिवाजी महाराजांविषयी खरचं अस्था असेल तर त्यांनी शिवजयंतीला देशभर सु्ट्टीची घोषणा करावी, असे देखील ठाकरे म्हणाले.