Corona Guidelines – मागील काही दिवसांपासून देशासह राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. ठाण्यात पहिला कोरोनाचा बळी गेला आहे. राज्यातील विविध भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनावर आळा घालण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार सतर्क झाले आहे. केंद्र सरकारने कोरोनाबाबत राज्याला मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. याबाबत पत्र लिहिले आहे, तर राज्याच्या आरोग्य विभागाने पालिका प्रशासनाला या मार्गदर्शक सूचनाबाबत पत्र पाठवले आहे.
खबरदारी घ्या…
दरम्यान, महाराष्ट्रामध्ये सध्या अंदाजे ५०६ रुग्ण सक्रिय असून त्यामधील बहुतांश प्रकरणे मुंबईतील आहेत. यापैकी बहुतांश प्रकरणे सौम्य असली तरी, पुरेशी खबरदारी म्हणून, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना खालील उपाययोजना करण्याबाबत केंद्र शासनाने मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. देशात दिनांक २८ मे २०२५ पर्यंत कोविड-१९ चे एकूण १६२१ रुग्ण सक्रिय आहेत, देशातील एकुण सक्रिय प्रकरणांपैकी ९०% पेक्षा जास्त प्रकरणे ६ राज्यांमध्ये (केरळ, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटक) आहेत. त्यामुळं खबरदारी घेण्याचे केंद्र सरकारने राज्याला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

कशा आहेत मार्गदर्शक सूचना?
(१) जिल्हा, उपजिल्हा पातळीवर तसेच वैद्यकीय महाविद्यालये, इतर शिक्षण/तृतीय सेवा संस्था, महानगरपालिका/नगरपरिषद रुग्णालये आणि इतर सर्व आंतररुग्ण सेवा सुविधांमध्ये रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेतला जावा. रोगनिदान, आवश्यक औषधे, PPEs, आयसोलेशन बेडस्, मेडीकल ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेडस् यांच्या पुरेशा उपलब्धतेवर भर देण्यात यावा. PSA plants ची कार्यक्षमता आणि एकंदर Oxygen Preparedness सुनिश्चित करण्यासाठी Mock Drills घेण्यात यावे. याबाबतच्या केलेल्या कार्यवाहीचा कृती अहवाल तात्काळ सादर करावा
(२) केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या “Operational Guidelines for Revised Surveillance Strategy in context of COVID-१९” नुसार सर्व SARI प्रकरणे आणि ILI प्रकरणांपैकी ५% प्रकरणांचे नमुने चाचणीसाठी पाठवणे महत्वाचे आहे.
(३) पॉझिटिव्ह चाचणीच्या SAFI प्रकरणांचे नमुने संपूर्ण whole genomic sequencing साठी Regional VRDL Centres कडे पाठविणे आवश्यक आहे.
(४) IDSP अंतर्गतच्या District Surveillance Unit नी त्यांच्या क्षेत्रातील SARI/ILI प्रकरणांचा trend वर बारकाईने लक्ष ठेवावे. सर्व ILI/SARI मधील SARI प्रकरणांच्या प्रमाणाचे monitoring करावे.
(५) COVID-१९ शी संबंधित सर्व माहिती (data) विशिष्ट सहव्याधी आजारांसह IDSP-IHIP वर नियमितपणे भरावा.
(६) तीव्र श्वसन आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याचे स्वयंनिरीक्षण ठेवावे आणि जर धाप लागणे, छातीत दुखणे इत्यादी लक्षणे जाणवल्यास जवळच्या आरोग्य सुविधांना (health facilities) कळवावे.