National Herald Case: सोनिया गांधी, राहुल गांधींची 700 कोटींची संपत्ती होणार जप्त, काय प्रकरण?

नॅशनल हेराल्ड प्रकरणात आता मोठी अपडेट समोर येत आहे .सोनिया गांधी अन् राहुल गांधींना मोठा धक्का, ईडीकडून 700 कोटींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

नवी दिल्ली: नॅशनल हेराल्ड प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. त्यामध्ये आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना मोठा धक्का बसला आहे.  अंमलबजावणी संचालनालयाकडून 700 कोटींची संपत्ती जप्त करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. नॅशनल हेराल्ड कंपनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी निगडित आहे. यामध्ये मुंबई, लखनौ आणि दिल्लीतील काही संपत्तीचा समावेश आहे. याशिवाय दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्गावरील स्थावर मालमत्तेचा देखील यामध्ये समावेश आहे.

आर्थिक अनियमितता आणि फसवणुकीचे आरोप

याबाबत समोर आलेली माहिती अशी की, ईडीने 11 एप्रिल रोजी मुंबई, दिल्ली आणि लखनौ या तिन्ही शहरांच्या मालमत्ता नोंदणी अधिकाऱ्यांना नोटीस पाठवून मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले. तपासात असे दिसून आले आहे की, एजेएलच्या मालमत्ता सुमारे 988 कोटी रुपयांच्या आहेत, ज्या बेकायदेशीर मार्गांनी मिळवण्यात आल्या होत्या. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र पूर्वी एजेएल द्वारे प्रकाशित केले जात होते. दिल्ली, मुंबई आणि लखनौ सारख्या शहरांमध्ये तिच्या अनेक मालमत्ता होत्या. ईडीचा आरोप आहे की YIL ने AJL ला फक्त 50 लाख रुपयांना खरेदी केले, तर त्यांची मालमत्ता 2000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या व्यवहारात आर्थिक अनियमितता आणि फसवणूकीचे आरोप झाले आहेत.

पीएमएलए अंतर्गत कारवाई

मनी लाँडरिंग कायद्या अंतर्गत कारवाईची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम (8) आणि नियम 5(1) अंतर्गत ही कारवाई करण्यात येणार आहे.   ईडीचे म्हणणे आहे की सोनिया आणि राहुल गांधी यांचा YIL मध्ये मोठा वाटा आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2014 मध्ये  दिल्ली न्यायालयात तक्रार दाखल केली होती. तेव्हा हे प्रकरण पहिल्यांदा प्रकाशझोतात आले. सोनिया आणि राहुल गांधी यांनी एजेएलच्या मालमत्ता चुकीच्या पद्धतीने वायआयएलला हस्तांतरित केल्याचा आरोप स्वामींनी केला होता.

यानंतर 2021 मध्ये ईडीने याबाबत अनेक मोठे खुलासे केले होते.  तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले होते. त्यानंतर अवघ्या देशात हे प्रकरण चर्चेत आले होते. आता या प्रकरणात मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे,


About Author

Rohit Shinde

Other Latest News