मुंबई 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी तहव्वुर राणा भारतात येत आहे. भारतीय एजन्सी त्याला एका विशेष विमानाने भारतात आणणार असल्याची माहिती समोर आली आहे. तहव्वुर राणा याला अमेरिकेच्या विशेष विमानाने भारतात आणलं जाणार आहे. तो उद्या 10 एप्रिलला सकाळी दिल्लीत उतरेल.
भारतात आल्यानंतर तहव्वुर राणासोबत काय होईल?
अमेरिकेकडून प्रत्यार्पण केल्यानंतर भारतात तहव्वुर राणावर केस सुरू होईल. यापूर्वी तहव्वुर राणाने कोठडीत छळ आणि भारतातील कायदेशीर मदतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. इतकच नाही तर अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी तिहार तुरुंगात तहव्वुर राणासाठी केलेल्या सुरक्षा व्यवस्थेची माहिती घेतली होती. मिळालेल्या माहितीनुसार, तहव्वुरला तिहारच्या तुरुंगात ठेवण्यात येणार आहे.

कोण आहे तहव्वुर राणा?
तहव्वुर राणा हा मूळ पाकिस्तानचा असून त्याच्याकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे. तो दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोय्यबाचा सक्रिय सदस्य होता. दहशतवादी डेव्हिड हेडलीला प्रवासाची कागदपत्रे देण्याचं काम तहव्वुरने केलं होतं. दहशतवादी हेडलीने मुंबईत रेकी केली होती, त्यानंतर मुंबईत दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. मुंबईत झालेल्या या हल्ल्यात सहा अमेरिकी नागरिकांसह 164 जणांचा हकनाक बळी गेला होता.
तहव्वुर राणा भारतात आल्यानंतर राणाला पातियाळा हाऊस येथील विशेष राष्ट्रीय तपास एजन्सीच्या न्यायालयात सादर केलं जाण्याची शक्यता आहे. यावेळी एनआयएकडून आरोपीची कोठडीत चौकशीची मागणी केली जाऊ शकते.
तहव्वुर राणावर काय आहेत आरोप?
डिसेंबर 2011 मध्ये दाखल केलेल्या एनआयएच्या आरोपपत्रानुसार, तहव्वुर राणा, डेव्हिड हेडली आणि अन्य सहा जणांवर भारतात दहशतवादी हल्ल्याचा आरोप होता. आरोपपत्रात 134 जणांचे जबाब, 210 कागदपत्रं आणि 106 ईमेल यांचा समावेश आहे. यामध्ये डेव्हिड हेडलीच्या पत्नीच्या इमेलचाही समावेश आहे. आरोपपत्रानुसार, 2005 मध्ये लश्कर-ए-तोय्यबा आणि हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामीचा ऑपरेटिव्ह म्हणून तहव्वुर राणा हल्ल्यांच्या आयोजनाचा भाग बनला होता.