महाकुंभमुळे उत्तर प्रदेशात शाकाहारी खवय्यांची संख्या वाढली? मांसाहार हॉटेलांमध्येही का झाली घट?

लखनवी आणि नवाबी पद्धतीच्या मांसाहारी खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या उत्तरप्रदेशात एक नवा ट्रेंड सुरू झाल्याचं दिसून येत आहे.

लखनऊ : श्रद्धा हा विषय उत्तर प्रदेशातील हॉटेलांच्या मेनूकार्डवर परिणाम करणारा ठरला आहे. काही वर्षांपूर्वी ज्या उत्तर प्रदेशातील महामार्ग आणि त्यावर असलेले ढाबे, हॉटेल्स हे चांगल्या मांसाहारी पदार्थांसाठी ओळखले जात होते, आज त्यांची जागा शाकाहारी ढाबे आणि हॉटेलांनी घेतली आहे. प्रयागराजमध्ये पार पडलेल्या महाकुंभमेळ्यामुळे हा बदल घडवून आल्याचं सांगितलं जात आहे.

उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या महामार्गांवर मांसाहारी पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेले अनेक ढाबे आणि हॉटेल्स होते. कुंभमेळ्याच्या काळात या हॉटेलांनी शाकाहारींसाठी वेगळ्या किचनचीही व्यवस्था हॉटेलात केली, मात्र तरीही कुंभचे यात्रेकरू या हॉटेलांमध्ये थांबत नव्हते. त्यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिकांनी मांसाहारी हॉटेल बंद करुन त्याचे रुपांतर शुद्ध शाकाहारी हॉटेलात केल्याचं पाहायला मिळतंय. उत्तर प्रदेशच्या प्रमुख रस्त्यांवरुन जातानाही हॉटेलांच्या पाट्या वाचून आहारात झालेला हा बदल प्रामुख्यानं जाणवतोय.

प्युअर व्हेज हॉटेलांच्या संख्येत वाढ

टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कुंभमेळ्यापूर्वी महिनाभरापासून हा बदल जाणवण्यास सुरुवात झाली होती. 45 दिवसांच्या कुंभमेळ्याच्या काळात देशातील कोट्यवधी भाविकांनी प्रयागराजची वाट धरली. या प्रवासाकडे धार्मिक म्हणून पाहण्यात आले. याचा परिणाम भाविकांच्या आहारातही दिसला. अनेक भाविकांनी या प्रवासात मांसाहार करण्यापेक्षा शाकाहार करण्यास पसंती दिली. हा बदल जाणवण्यास सुरुवात झाल्यानं उत्तर प्रदेशातील महामार्गांवरील अनेक हॉटेलांनी मांसाहारी हॉटेल हे बिरुद काढून शुद्ध शाकाहारी किंवा प्युअर व्हेज अशा पाट्या दुकानांवर लावल्या.

त्रिवेणी भक्तिमार्गाचाही परिणाम

कुंभमेळ्याला आलेल्या अनेक भाविकांनी या निमित्तानं उत्तर प्रदेशात धार्मिक पर्यटन केलं. त्यात काशी-अयोध्या आणि विध्यांचल या त्रिवेणी भक्तीमार्गाला अधिक पसंती होती. या परिसरात आलेल्या भाविकांनी आहारातही शाकाहारी भोजनाला पसंती दिल्याचं पाहायला मिळालंय.

कसे बदलले शाकाहार आणि मांसाहाराचे प्रमाण

गेल्या काही वर्षापर्यंत या परिसरात रस्त्यांवरील हॉटेलांवर उत्तम मांसाहारी पदार्थांचा दावा करणाऱ्या पाट्या होत्या. मात्र 2021 साली काशी विश्वेधर धाम आणि 2024 साली अयोध्येत रामलल्लाच्या मंदिराची उभारणी झाल्यानंतर पर्यटक आणि भाविकांच्या संख्येत वाढ झाली. या भाविकांचा आहार शाकाहार असल्यानं व्यवसायात झालेला बदल पाहायला मिळतोय. सद्यस्थितीत 100 पैकी 80 जणं शाकाहारी आणि 20 जण मांसाहारी असं प्रमाण झाल्याचं या परिसरातले अभ्यासक सांगतात.

प्रयागराजमध्ये सर्वाधिक परिणाम

महाकुंभच्या काळात प्रयागराजमध्ये शाकाहाराचे प्रमाण वाढल्याचं मोठ्या प्रमाणावर दिसून आलंय. शहरातील 400 हॉटेल्स आणि 280 रेस्टॉरंटपैकी 80 टक्क्यांहून अधिक हॉटेल्स ही शाकाहारी झाल्याचं पाहायला मिळालंय. प्रयागराजमध्ये कुंभच्या काळात घरगुती खानावळीही शाकाहारी झाल्याचं समोर आलंय.

लखनवी आणि नवाबी पद्धतीच्या मांसाहाराच्या पदार्थंसाठी उत्तर प्रदेशची एक वेगळी ओळख आहे. ही ओळख धार्मिक पर्यटनाच्या या परिघात बदलत जाते की काय, अशी शंका निर्माण करणारा हा बदल पाहायला मिळाल्याचं सांगण्यात येतंय.


About Author

Smita Gangurde

Other Latest News