वॉशिंग्टन : अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफची घोषणा करून एकच खळबळ उडवून दिली होती. ट्रम्प यांच्या धोरणा विरोधात अमेरिकेत देखील टीका करण्यात येत होती. अखेर चीनवर टॅरिफ कायम ठेवून बाकी देशांना सवलत देत टॅरिफला 90 दिवसांची स्थगिती दिली होती.
या स्थगितीनंतर आणखी एक यू टर्न घेत स्मार्टफोन, काॅम्युटर, चिप्स यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना टॅरिफमधून सूट दिली आहे. या निर्णयामुळे अमेरिकेत वाढणाऱ्या या वस्तुंच्या किंमती स्थिर राहणार आहेत. अॅपल, सॅमसंग सारख्या कंपन्याना या घोषणेचा फायदा होणार आहे.

नोटीस जारी केली
अमेरिकेच्या कस्टम्स आणि बॉर्डर प्रोटेक्शनने काही वस्तूंना टॅरिफमधून सूट देण्याबाबत एक नोटीस प्रसिद्ध केली. त्यानुसार, ट्रम्प यांनी मोबाइल फोन, संगणक यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना टॅरिफमधून सूट दिल्याचे जाहीर केले. यामध्ये चीनवर लावलेला 125% टॅरिफ आणि इतर देशांवर लावलेला 10% टॅरिफ या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर लागू होणार नाही.
सेमीकंडक्टरला सूट
ट्रम्प यांनी सूट दिलेल्या इलेक्ट्रोनिक वस्तुंमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, हार्ड ड्राइव्ह, काॅम्युटर प्रोसेसर आणि मेमरी चिप्स यांचा समावेश आहे. या सर्व वस्तू सर्वसाधारणपणे अमेरिकेत बनविल्या जात नाहीत. शिवाय सेमी कंडक्टर बनविण्यासाठी लागणाऱ्या मशीननाही सूट देण्यात आली आहे.
याआधीही ट्रम्प यांचा यूटर्न
आपण जाहीर केलेल्या टॅरिफ धोरणावरून मागे हटणार नसल्याचे जाही करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ धोरणाला 90 दिवसांची स्थगिती घेत यूटर्न घेतला होता. आत्ता पुन्हा इलेक्ट्रीक वस्तुंवरील टॅरिफ माफ केला. यामध्ये चीनमधून येणाऱ्या वस्तुंचा देखील समावेश आहे.