मुंबईकरांचं टेन्शन वाढलं, ऐन उन्हाळ्यात पाणी टँकर बेमुदत संपावर; मॉल्स-कार्यालयांवरही परिणाम

पाणी टँकर चालकांनी का पुकारला संप? हा संप किती काळ राहण्याची शक्यता?

Water Crises : ऐन उन्हाळ्यात मुंबईतील पाण्याच्या टँकर चालकांनी संप पुकारला आहे. धरणांत केवळ 30 टक्के पाणीसाठा शिल्लक असताना, या संपामुळे मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील अनेक भागात पाणीबाणी सुरू आहे. अनेक सोसायटी, मॉल, कार्यालयांमध्येही टँकरने पाणीपुरवठा केला जातो. मात्र टँकर चालकांनी संप पुकारल्यामुळे  मोठं संकट उभं राहिलं आहे. पाणीबाणीचा त्रास लक्षात घेता अनेक कार्यालयांमध्ये वर्क फ्रॉम होम देण्यात आलं आहे.

भूजल प्राधिकरणाच्या नव्या नियमांमुळे टँकरचालक नाराज आहेत. टँकर चालकांनी पुकारलेल्या बंदमुळे, उपनगरांत घाटकोपर, कुर्ला, सांताक्रूझ, अंधेरी परिसरात पार्किंग केलेल्या 2 हजारांपेक्षा जास्त टँकरची गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिकेनं केंद्र सरकारच्या नव्या नियमांची अंमलबजावणी केल्यानं नाराज झालेल्या मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने संप पुकारला आहे.

टँकर चालकांचा संप कशासाठी?

1. एनओसीशिवाय पाणीपुरवठा करण्यावर केंद्र सरकारच्या बंदीचा नवा नियम
२. विहीरी आणि बोअर मालकांकडे एनओसी नसेल तर पाणीपुरवठा बंद होणार
३. केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमाची मुंबई महापालिकेकडून अंमलबजावणी
४. मुंबई महापालिकेची नोटीस आल्यानं विहीर, बोअरवेल मालकांची कोंडी
५. बोअरवेल मालकांकडे एनओसी नसल्याने पाणीपुरवठा करायचा कसा, हा प्रश्न
६. या निर्णयाविरोधात मुंबई वॉटर टँकर सेवा बंद करण्याचा निर्णय

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात 30 टक्के साठा शिल्लक

मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट असताना वॉटर टँकर असोसिएशनने बेमुदत संपाचं हत्यार उपसल्यानं त्याचा फटका मुंबईला बसणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत केवळ 30 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. शहरांतील विविध भागांत पाणीटंचाई आहे, त्यामुळे अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. हॉटेल, झोपडपट्टी, मेट्रो, कोस्टल रोडसह शहरात बांधकाम प्रकल्पांनाही टँकरनं पाणीपुरवठा केला जात आहे.

मुंबईत दररोज 2500 पाण्याचे टँकर्स धावतात. टँकरने दररोज 2000 एमएलडी पाणी पुरवलं जातं. निवासी, औद्योगिक आणि व्यापारी संस्थांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. बोअरवेल्स, जुन्या विहिरीतून टँकर पाणी उपसतात. मुंबईत 1948 परवानाधारक पारंपरिक विहिरी आहेत. मुंबईत 14 हजार 519 परवानाधारक बोअरवेल्स आहेत. पिण्यालायक नसलेल्या स्रोतांमधूनही टँकर पाणी घेत असल्याचं दिसतं. मालमत्तांचे मालक, टँकर मालक यांच्यात सामंजस्य करार झाला. धक्कादायक बाब म्हणजे टँकरमधील पाण्याचे कुठेही शुद्धीकरण केलं जात नाही. टँकरमधील पाण्याची गुणवत्ताही तपासली जात नाही. टँकरमधील पाणी पिण्यासाठी किंवा स्वयंपाकासाठी योग्य नसतं. रोगराईचा धोका असल्यानं मुंबई महापालिकेचं कडक धोरण अवलंबवलं आहे. महापालिकेचं ना हरकत प्रमाणपत्र घेतल्याशिवाय टँकर्सनी पाणीपुरवठा करू नका अशा नोटीसा विहीर मालकांकडून काढण्यात आल्या आहेत.

 


About Author

Smita Gangurde

Other Latest News