मुंबई : राज्याचा कौशल्य विभाग हा खूप महत्त्वाचा विभाग आहे. यातून अनेक विद्यार्थी घडत आहेत. तसेच काळाची गरज ओळखून रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठ विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून जगभरात भारतीय कुशल मनुष्यबळ पुरवत आहे. ही आनंदाची बाब आहे असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या समारोप कार्यक्रमात राज्यपाल राधाकृष्णन विद्यार्थ्यांना संबोधित केले, त्यावेळी ते बोलत होते.
बदलत्या काळानुसार बदलले पाहिजे…
दरम्यान, मुख्य प्रवाहातील शिक्षणामध्ये कौशल्याधारित शिक्षणाचा समावेश केल्याने जागतिक स्तरावर रोजगाराभिमुख संधी उपलब्ध होऊ शकते. जगात आवश्यक असलेले मनुष्यबळ पुरवण्यासाठी आपल्या महाराष्ट्रात मोठा वाव आहे. बदलत्या काळात आपल्या पारंपरिक कौशल्याच्या पलीकडे जाऊन आपण नवी पिढी घडवली पाहिजे, त्यासाठी आपल्या शिक्षकांनीही नवी संकल्पना समजून घेऊन त्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना द्यायला हवे. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने AI तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, वाणिज्य आणि मीडिया या क्षेत्रात कौशल्य शिक्षण आणि प्रशिक्षणाचा प्रारंभ केला आहे, हे अतिशय आनंददायक आणि उल्लेखनीय आहे. रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विभागाच्या कुलगुरू श्रीमती अपूर्वा पालकर या दृष्टिकोनातून योगदान देत असल्याबाबत त्यांचेही अभिनंदन करतो असेही, राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी नमूद केले.

विद्यार्थ्यांनी एखादी तरी जागतिक भाषा शिकावी…
राज्याच्या कौशल्य विभागाने जर्मन भाषा विद्यार्थ्यांना शिकवून मनुष्यबळ पुरवण्याचा अतिशय योग्य निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांनी एखादी तरी जागतिक भाषा शिकावी. जागतिक कौशल्य आत्मसात करताना परदेशी भाषा शिक्षण अतिशय महत्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला ‘विकसित राष्ट्र’ निर्माण करण्याचा संकल्प केलाय. विकसित राष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टीने त्यांनी सुरू केलेला ‘स्किल इंडिया’ हा उपक्रम या संकल्पात महत्वाचा भाग आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) कौशल्य, भारतीय मूल्ये आणि एकात्मिक शैक्षणिक प्रणालीवर भर देत आहे. याबाबत रतन महाराष्ट्र विद्यापीठाने आधीच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), सेवा क्षेत्र, रिअल इस्टेट आणि औद्योगिक व्यवस्थापनात हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास सुरु केले आहे. ही स्वागतार्हाय बाब असल्याचे राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले.