सोलापूर शहरात सध्या बहुतांश भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचं समोर आलं आहे. याच दूषित पाण्यामुळे सोलापुरात दोन मुलींचा हकनाक बळी गेला. मात्र या दूषित पाण्याच्या समस्येवर सोलापूर महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.
सोलापूर शहरातील नळाच्या पाण्यातून काळं पाणी बाहेर पडतंय. असं काळं पाणी प्यायचं तरी कसं, असा प्रश्न सोलापुरकरांना पडला आहे. या दूषित पाणीपुरवठ्यामुळं शहरातील अनेक भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. सोलापुरातील मोदी भाग, बाबू जगजीवनराम झोपडपट्टी, पूर्व भागातील कुचन नगर, दत्त नगर, भवानी पेठेतील मराठा वस्ती, रेल्वे लाईन परिसरात कोणापुरे चाळ यासह शहरातील अनेक भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे. सर्वसाधारणपणे उन्हाळ्याच्या आणि पावसाळाच्या सुरुवातीला सोलापुरात दूषित पाणी येत असल्याचं नागरिकांनी सांगितलं. मात्र हे दूषित पाणी जीव घेत असल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

दूषित पाण्यामुळे सोलापुरकर हैराण…
सोलापूर शहराला उजनी धरणातून पाणीपुरवठा होतो. उजनीतून हे पाणी औज बंधाऱ्यात येतं, तिथून जलशुद्धीकरण होऊन ते शहरांतील टाक्यांमध्ये जातं. टाक्यांतून हे पाणी जल वाहिन्यांतून घराघरात येतं. मात्र या जलवाहिन्या सडलेल्या अवस्थेत असल्याची माहिती आहे. अनेक ठिकाणी नाल्यांतून आणि झोपडपट्ट्यांतून गेलेल्या जलवाहिन्यांचं दुरूस्तीचं काम अनेक वर्षांपासून खोळंबलं आहे. सध्या उन्हाळा असल्यानं सोलापुरात सहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो. ते पाणी जरं असं दूषित असेल तर करायचं काय असा सवाल विचारण्यात येत आहे.
दूषित पाण्यामुळे दोन मुलींचा मृत्यू…
शहरातील जगजीवनराम झोपडपट्टीत राहणार्या दोन शाळकरी मुलींचा नुकताच दूषित पाण्याच्या समस्येनं मृत्यू झाला. तिसरी मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे. मात्र यावर तोडगा सुचवण्याऐवजी आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. महापालिकेच्या आयुक्तांनी मात्र डेंग्यू सदृश आजारानं या मुलींचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक माहितीच्या आधारावर सांगितलं. शवविच्छेदन अहवालानंतर कारण स्पष्ट होणार असलं तरी पाण्याशी निगडित समस्येमुळे दोन बहिणींना जीव गमवावा लागला, हे वास्तव नाकारता येणारं नाही.