मुंबई: राज्यात सध्या राजकारणामुळे वेगळी झालेली दोन कुटुंब एकत्र येतील, अशा आशयाचा जोरदार चर्चा सुरू आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे, याचदरम्यान काका-पुतण्या म्हणजेच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील अशा चर्चांनी जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये काही कौटुंबिक कार्यक्रम आणि शासकीय कार्यक्रमांत, बैठकांत हे नेते एकत्र दिसल्याने या चर्चा सुरू झाल्या आहेत.यावर आता राजकीय क्षेत्रातून देखील प्रतिक्रिया उमटत आहेत.
मविआच्या नेत्यांकडून सकारात्मक प्रतिक्रिया
दरम्यान यावर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील प्रतिक्रीया दिली आहे, असं काही घडणार असेल, तर या निर्णयाचं स्वागतच आहे. असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील यावर प्रतिक्रिया आली आहे, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुभाष देसाईंनी यावर प्रतिक्रीया दिली आहे. ” काहीही होऊ शकतं, अशक्य असं काहीच नाही. काही गोष्टी आणि बदल हे सतत होत असतात. पक्षाचे दोन भाग होतात दोन भाग पुन्हा एकत्र येतात. पुढचा काळ हा अतिशय उलथापालथीचा काळ आहे, अनेक घडामोडी घडू शकतात. पण महाराष्ट्राच्या हितासाठी जर घडामोडी घडत असतील तर त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. दोघांचं पुन्हा मनोमिलन कसं होतं हे बघायला महाराष्ट्र उत्सुक आहे. आम्ही सुद्धा उत्सुक आहोत,” अशी प्रतिक्रिया देसाई यांनी दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जाणकारांचं मत काय?
जाणकारांच्या मते, राज्यातील वास्तविक राजकीय परिस्थिती आणि आजवरचा इतिहास पाहता तुर्त अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याची शक्यता अगदीच धुसर आहे. ज्या मुद्द्यावर अजित पवारांनी शरद पवारांशी काडीमोड घेतला, त्या मुद्द्यावर अजित पवारांना गेल्या विधानसभेत चांगलं राजकीय यश मिळालं आहे, परिणामी अजित पवार काकांशी हातमिळवणी करण्याची कोणतीही शक्यता नाही.
ठाकरेंच्या युतीची शक्यता
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्याची भूमिका बोलून दाखवली, आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन काम करायला आवडेल असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.