परळी : बीडच्या कारागृहात असलेल्या संतोष देशमुख्य हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या जीवाला धोका असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण निलंबित पीएसआय रणजित कासले याने वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर आपल्याला होती, असा धक्कादायक दावा केला आहे.
कासले म्हणाला, वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी ऑफर देण्यात आली होती. एन्काऊंटरच्या कामासाठी लमसम अमाऊंट दिली जाते. पाच कोटी, 10 कोटी, 50 कोटी. मात्र मी ऑफर नाकारली. त्यावेळी मी सायबर विभागात होतो.

अशाकामासाठी दुसऱ्या विभागात असला तरी त्याला बोलवून घेतले जाते. त्यांना माहीत होतं माझ्यात दम आहे. माझ्यात ते गट्ट आहेत. पण मी नाही म्हटलो, असे देखील कासले म्हणाला.
अक्षयचा एन्काऊंटर फेक
कल्याणमधील चिमुकलींवर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर फेक असल्याचा दावा देखील कासले याने केला आहे. तो म्हणाला, या प्रकरणी एसआयटी नेमूण काही उपयोग नाही. एसआयटी नेमायची असेल तर ती केंद्राची नेमा.
असा होता एन्काऊंटर प्लॅन
जेव्हा कोणाचा एन्काऊंट करायचा असतो त्याविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहसचिवांना माहिती असते. या सगळ्यांची या संदर्भात गुप्त बैठक होते. या बैठकीत ठरवले जाते की एन्काऊंटर कसा करायचा. त्यासाठी पोलिसांची टीम निवडली जाते. त्यांना विशिष्ट रक्कम देण्याचे निश्चित केले जाते तसेच चौकशी आम्हीच करणार असून तुम्हाला यातून बाहेर काढण्याचे आश्वासन देखील दिले जात असते, असा दावा देखील रणजित कासले याने केला आहे.