सुनील तटकरेंच्या घरी अमित शाहांसाठी होता फक्कड बेत, ताटात होते ‘हे’ खास मेनू

रायगड : गृहमंत्री अमित शाह आज (शनिवारी) रायगडच्या दौऱ्यावर होते. किल्ले रायगडावरी कार्यक्रमानंतर ते थेट रोह्यातील खासदार सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनासाठी गेले. शहांच्या स्वागताची जय्यत तयारी तटकरे परिवाराकडून करण्यात आली होती. तसेच त्यांच्यासाठी खास मेनूचा बेत देखील आखण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, शहा यांच्यासाठी महाराष्ट्राचे पारंपारिक पदार्थ तयार करण्यात आले होते. तसेच आमरस पुरी, मिसळ पाव, शाबुदाणा वडा असा मेनू देखील होता. मांसाहारींसाठी देखील मटणाच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

स्नेहभोजनासाठी अमित शहा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते.  आमदार भरतशेठ गोगावले यांना निमंत्रण असून देखील ते वैयक्तिक कारणामुळे स्नेहभोजनाला उपस्थित राहू शकले नाहीत.

शिवाजी महाराज आमची प्रेरणा

गृहमंत्री अमित शाह यांनी रायगडावरील कार्यक्रमात सांगितले की, मी येथे भाषण करण्यासाठी आलेलो नाही तर शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आलो आहे. शिवाजी महाराज ही आमची प्रेरणा भूमी आहे. ज्या जागेवर सोन्याच्या सिंहासनावर महाराज बसले त्या जागेला मी वंदन करताना मी रोमांचित झालो.

मुंबईकडे रवाना

गृहमंत्री अमित शाह हे स्नेहभोजनानंतर आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी मुंबईकडे रवाना झाले. शहा आज रात्रीच मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे. त्यापूर्वी ते सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्यासोबत राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची शक्यता आहे.


About Author

Arundhati Gadale

Other Latest News