Maharashtra Weather Update : राज्यातील अनेक भागात 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान आहे. गरमीमुळं अंगाची लाही-लाही होत आहे. सध्या उन्हाळा सुरू आहे. दिवसभर कडाक्याचे ऊन असल्यामुळं राज्यात कमालीचा उकाडा आहे. वातावरणातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात मान्सून दाखल होण्यास अडीच-तीन महिन्याचा अवधी असताना आतापासून पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. दरम्यान, पावसाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यात पुढील काही दिवसात पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
पावसाला कारण काय?
दरम्यान, पुढील काही दिवसात मुंबईसह राज्यातील काही भागात पावसाळी वातावरण निर्माण होऊन पुढील तीन-चार दिवसात महाराष्ट्रात काही भागात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान, जिथे हलक्या स्वरुपाची हवा निर्माण होईल आणि प्रभावित क्षेत्र तयार होते. त्या ठिकाणी पाऊस पडतो. तसेच समुद्रातील तापमान वाढले आहे. समुद्रातील तापमान हे साधारण 28 अंश सेल्सिअस असते. पण सध्या हिंदी महासागरातील तापमान 30 अंश सेल्सिअस आहे. तर अरबी समुद्रातील तापमान 31 अंश सेल्सिअस आहे. परिणामी तापमान वाढल्यामुळं बाष्पीभनाचा वेग वाढला आहे. या बाष्पीभवनाच्या प्रभावामुळं पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळं राज्यात पुढील काळात पाऊस पडणार आहे. असं हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी माहिती दिली आहे.

उकाड्यात थंडावा…
एकीकडे जरी हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला असला तरी दुसरीकडे राज्यात उन्हाचा चटका कायम आहे. दिवसभर उन्हाचा प्रचंड कडाका लोकांना जाणवत आहे. राज्यातील काही भागात 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान आहे. त्यामुळं गर्मी आणि उकाड्यामुळं नागरिक हैराण झाले असून, कधी एकदा पाऊस पडून गारवा मिळतो. अशी अवस्था लोकांची झाली आहे. विदर्भातील काही भागात उष्णतेची लाट कायम आहे. उष्णतेच्या लाटेमुळं लोकांना दिवसभर बाहेर पडणे अवघड झाले आहे. वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेलाही वेग आल्यामुळं पावसाची स्थिती निर्माण झाला असल्याचे हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी म्हटले आहे.
राज्यात पावसाचा इशारा कुठे?
राज्यातील अनेक भागात ऐन उन्हाळ्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली लातूर, धाराशिव, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार, जालना आणि यवतमाळ भागात पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.