नवी मुंबई – फळांचा राजा अशी ओळख असलेला आंबा हा गेल्या काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती दाखल झाला होता. इथे मोठ्या प्रमाणात कोकणातील हापूस आंब्याची आवक होत असते. अन्य जातीचे आंबेही मोठ्या प्रमाणात विक्री केले जातात. दरम्यान, नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी एक लाख 13 हजार पेट्यांची आवक झाली. यातून तब्बल 293 टन आंब्याची आवक झाली असल्याची माहिती समोर येत आहे.
पहिल्यांदाच 1 लाख पेट्यांचा टप्पा पूर्ण
दरम्यान, कोकणातील हापूस आंबा नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत काही दिवसापूर्वी दाखल झाला आहे. कोकणातील हापूस आंबा हा देशाप्रमाणे विदेशात हे पाठवला जातो. देशातील आंब्याची परदेशात निर्यात केली जाते. उन्हाळ्याची सुट्टी पडल्यामुळे आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत आंब्याची आवक सुरु झाली होती. तर सोमवारी पहिल्यांदाच एक लाख पेट्यांचा टप्पा पूर्ण झालाय. तसेच या आठवड्यात आणि पुढील आठवड्यात आणखी राज्याच्या अन्य भागातून येथे पेट्यांची आवक वाढेल आणि हापूस आंब्याचीही आवक वाढेल. असा विश्वास कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दर नियंत्रणात…
दुसरीकडे या आठवड्यात दाखल झालेला आंबा आठवड्याच्या शेवटपर्यंत पिकून तो ग्राहकांना उपलब्ध होईल. त्यामुळे पुढील आठवड्यात आंब्याचे दर आणखी कमी होतील, असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तर बाजारात एकूण सोमवारी एकूण 80 हजार 746 पेट्या आणि इतर राज्यातून 33 हजारांच्यावर पेट्यांची आवक झाली होती. गेल्या आठवड्यात होलसेल मार्केटमध्ये 300 ते 1200 रुपये डझन दराने आंबा विकला गेला. तर हेच आंब्याचे दर 200 ते 800 रुपये डझन झाले आहेत. त्यामुळे सध्या आंब्याचे दर नियंत्रणात असले तरी पुढील काळात वाढू शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.