मुंबई – विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती. या योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये सरकारने महिलांच्या खात्यात जमा केले. या योजनेमुळे महायुती पुन्हा सत्तेत आल्याचे बोलले जाते. या योजनेला अभूतपूर्व असा प्रतिसाद राज्यभर मिळाला. ही योजना महायुतीसाठी गेम जर ठरली आहे. मात्र आता लाडक्या बहिंणींनो जरा जपून… कारण लाडक्या बहिणीच्या योजनेतून तुम्हाला कर्ज मिळवून देतो. असं सांगून मुंबईतील मानखुर्दमध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल 65 महिलांना 20 लाखाचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
वित्त कंपनीतील २ कर्मचाऱ्यांचा समावेश…
दरम्यान, लाडक्या बहिणी योजनेतून बनावट कागदपत्राच्या आधारे मुंबईतील मानखुर्दमध्ये 65 महिलांची फसवणूक केली आहे. कर्ज देतो म्हणून बनावट कागदपत्र तयार करून लाडक्या बहिणींच्या नावाने २० लाखाचे कर्ज आरोपींनी परस्पर घेतल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीमध्ये मानखुर्दमधील एका महिला तर चार ते पाच जणांचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे या 65 महिलांना गंडा घालणारा आणि वीस लाखाचे कर्ज घेणाऱ्यामध्ये फायनान्स कंपनीतील दोन कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यामुळे या आरोपीमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का? याचा पुढील तपास पोलीस करतात.

महिलांच्या नावे आयफोन खरेदी…
दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या योजनेतून तुम्हाला कर्ज मिळवून देतो. यासाठी तुमचे रीतसर कागदपत्र लागतील. असे या महिलांना फोन कॉल आले. आपल्याला कर्ज मिळेल, या आशाने या महिलांनी कागदपत्र दिले. मात्र या कागदपत्राचा चुकीचा वापर करत आरोपींनी 65 महिलांच्या नावे आयफोन खरेदी करत तब्बल वीस लाखाचे कर्ज परस्पर काढले. ही बाब फायनान्स कंपनीच्या लक्षात येताच फायनान्स कंपनीच्या वतीने पोलिसात तक्रार दिली असून, गुन्हा नोंदवला आहे. आपली फसवणूक झाल्याचे महिलांच्या लक्षात येताच महिलांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत घडलेला सर्व प्रकार सांगितला. कर्ज देतो म्हणून आमची सेल्फी काढली. सुरुवातीला प्रत्येकी दोन ते पाच हजार रुपये त्यांच्या हाती ठेवले. तीन महिन्याचे दहा हजार रुपये येतील. पुढे वाढत लाखभर पैसे मिळण्याचे अमिष दाखवल्याचे महिलांनी सांगितले. दरम्यान, आरोपीचा शोध पोलीस घेत असून, लाडक्या बहिणीनो असे कुठलेही कर्जासाठी फोन आले तर सावध राहण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.