मुंबई : आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रकल्पांबाबत बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. राज्यातील आरोग्य उपकेंद्र ते संदर्भ सेवा रुग्णालयांपर्यंत असलेल्या विविध आरोग्य संस्थांचे बळकटीकरण आणि तिथली कामांची पारदर्शकता निर्माण करण्यासाठी विस्तृत प्रकल्प तयार करण्याच्या निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
‘मिशन’ राबविण्यात यावे…
दरम्यान, राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्यात येत आहे. महाविद्यालयांसाठी संबंधित जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभागाची रुग्णालय संलग्न करण्यात आली आहे. याबाबत अधिक लोकसंख्या आणि रुग्णसंखेचे भार असलेल्या ठिकाणी स्वतंत्र रुग्णालय निर्माण करण्यात यावेत. आणि वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण आणि सक्षमीकरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा. विशेष म्हणजे लोकांना दर्जेदार आणि चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपायांचा अवलंब करण्यात यावा. तसेच हा प्रकल्प आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने ‘मिशन’ म्हणून राबविण्यात यावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

आरोग्य विज्ञान विद्यापीठ ‘हब’ आणि सात ‘स्पोक’
कर्करोग निदान उपचाराबाबत केंद्र सरकारने राष्ट्रीय कर्करोग उपचार धोरण आणले आहे. यामुळं राज्यात कर्करोग निदान आणि उपचारासाठी संदर्भ सेवा देण्याबाबत प्रभावी कार्यपद्धती ठरविण्यात यावी. रेडिएशन थेरपी, कर्करोगावर केमोथेरपी या उपचारांचा समावेश असावा. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश देताना विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणानंतर विशिष्ट कालावधी ठरवून सरकारी रुग्णालयांत सेवा देणे बंधनकारक करण्यात यावे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ ‘हब’ आणि सात ‘स्पोक’ प्रस्तावित आहेत. तसेच आरोग्य क्षेत्रात चांगली सेवा निर्माण करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा भर आहे. यासाठी आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली विकसित करण्यात येत आहे. असंही मुख्यमंत्री म्हणाले.