कश्मीर : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काल (बुधवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने काश्मीरला रवाना झाले होते. मंत्री गिरीश महाजन हे काश्मीरला गेले असताना एकनाथ शिंदेंच्या कश्मीर दौऱ्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या. मात्र,शिंदे यांनी आपल्या काश्मीरच्या या दौऱ्यात काय केले हे समोर आले आहे.
शिंदे यांनी पर्यटकांची भेट घेत त्यांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी पर्यटकांना धीर दिला.त्यांच्याशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री स्वतः कश्मीरमध्ये आल्याने पर्यटकांचा देखील आत्मविश्वास वाढला. सरकार पर्यटकांच्या मागे ठामपणे उभे असल्याचे शिंदे यांनी पर्यटकांना सांगितले.

जखमी सुबोध पाटील
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कामोठे येथील रहिवाशी सुबोध पाटील हे श्रीनगर येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती जाणून घेतली आणि ते लवकरात लवकर पूर्ण बरे होऊन आपल्या घरी परतावे यासाठी लागेल ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले.
काश्मीरच्या उपमुख्यमंत्र्यांशी
शिंदे यांनी पहेलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये असलेल्या पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरींदर कुमार चौधरी यांनी भेट घेऊन चर्चा केली. पर्यटकांना त्यांच्या राज्यात सुखरूप परत पाठवण्यास सरकारचे प्राधान्य असून त्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही चौधरी यांनी दिली.
पर्यटकांना निरोप
अडकून पडलेल्या पर्यटकांपैकी १८४ पर्यटकांना मुंबईला घेऊन जाणारे दुसरे विमान आज श्रीनगरहून मुंबईकडे रवाना झाले त्यावेळी शिंदेंनी पर्यटकांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला आणि सुरक्षित प्रवासासाठी या सर्वांना आश्वस्त करून निरोप दिला.