मुंबई – ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा सुरू झाल्यानंतर महायुतीचे नेते यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. महायुतीतही भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रतिक्रियेकडे अनेकांचं होतं. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिलीय तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य करण्याचं टाळलंय.
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत असलेले वाद हे महाराष्ट्राच्या हितापेक्षा मोठे नाहीत, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर किरकोळ भांडणं विसरायला आपणही तयार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायचं असेल तर तडजोडी नको, असंही उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना सुनावलंय. या निमित्तानं मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील, अशी आशा राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चेत आलीय.

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असतील, तर आम्हाला आनंदच आहे. कोणीही आपआपसातील मतभेद विसरुन एकत्र येत असतील तर त्यात वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. माध्यमे यावर जास्त विचार करतायेत. त्यामुळे वाट बघा, एकत्र आले तर उत्तमचं आहे, स्वागतच करु.’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या प्रतिक्रियेतील ‘वाट बघा’ या शब्दाची चर्चा आणि राजकीय अर्थ आता काढण्यात येत आहेत.
उपमुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
शिवसेनेत बंडखोरी करुन स्वतंत्र शिवसेना निर्माण करणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र या विषयावर भाष्य करण्याचं टाळलंय. एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या सातारा जिल्हातील दरे या गावी आहेत. त्यांना ठाकरे बंधुंच्या मनोमीलनाबाबत प्रश्न विचारला असता ते अस्वस्थ झाल्याचं जाणवलं, त्यांनी समोरच्या चॅनेलचा बूम दूर करत काय रे तू, असं म्हणत प्रतिक्रिया देण्याचं टाळलंय. एकनाथ शिंदेंची याबाबतची नाराजीच याततून स्पष्टपणे दिसलीय. काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या घरी जात त्यांची भेट घेतली होती.