पुणे: महाराष्ट्रात एप्रिलच्या मध्यात ऊन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील आणखी जास्त वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आता राज्यातील काही शहरांचा पारा 41 अंशांवर गेल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत हे तापमान वाढत गेल्यास आणखी धोका संभवतो. राज्यात कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चचका त्रायदायक ठरत आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा होरपळणार!
आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उर्वरीत राज्यभरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश शहरे आणि ग्रामीण भागात तापमान 41 अंशांवर पोहोचले आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशातील बिकानेर येथे सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे, तापमान 45.1 अंशावर पोहोचले होते. पाठोपाठ राज्यातील अकोला शहराचा नंबर लागलाय, अकोलामध्ये काल 44.1 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली होती. ही निश्चितच चिंताजनक बाब आहे.

धुळे, चंद्रपूर, यवतमाळ येथे 43 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर पाठोपाठ जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, सोलापूर, मालेगाव या शहरांचे तापमान 42 अंशांवर पोहोचले आहे.
वाढते तापमान घातक
ग्लोबल वार्मिंगची खरी झळ यंदा ऊन्हाळ्यात राज्याने अनुभवली आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताने होणाऱ्या मृत्यूंमध्येही वाढ झाली आहे. तसेच देशातील काही ठिकाणचे तापमान येणाऱ्या काळात 50 अंशांवर धडकण्याची शक्यता शास्त्रज्ञ वर्तवत आहेत.
वाढत्या तापमानात अशी घ्या काळजी
अशा परिस्थितीत उन्हापासून बचाव करणे अत्यंत जरूरीचे बनले आहे. वाढत्या तापमानात उष्माघात आणि अन्य आजारांपासून स्वत;चे संरक्षण करणे गरजेचे आहे. पाणी पिण्याचे प्रमाण वाढवण्या बरोबरच आपण राहतो ते ठिकाणी थंड ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सकाळी 10 ते संध्याकाळी 4 या वेळात गरज नसल्यास बाहेर पडणे शक्यचो टाळावे. उलटी, डोकेदुखी असे प्रकार जाणवल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, आणि योग्य उपचार करावेत.