मुंबई: राज्य मार्ग परिवहन म्हणजेच एसटी महामंडळाने तयार केलेल्या अॅपच्या माध्यमातून आता प्रवाशांना एसटी बसचे लोकेशन जाणून घेता येणार आहे. प्रवाशांना लालपरीचे लोकेशन मोबाईलवर कळणार आहे. एसटी तिकिटावर असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून बस स्टँडवर गाडी येण्याची अचूक वेळ समजणार आहे. हे अॅप्लिकेशन येत्या महिनाभरात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. एसटी मुख्यालयात महामंडळाचे अध्यक्ष म्हणून मंत्री सरनाईक यांनी नुकताच पदभार स्विकारला, त्यानंतर सरनाईक यांनी परिवहन संस्थेच्या ताफ्यातील 15000 गाड्यावर जीपीएस बसवण्यात अपयशी ठरणाऱ्या कंत्राटदारांना कारवाईचा इशारा दिला आहे.
पुढच्या महिन्यात सुविधा सुरू होणार?
राज्य सरकारने कोविड 19 साथीच्या आधी एसटीच्या ताफ्यातील बसेसमध्ये जीपीएस बसविण्याचे कंत्राट काही कंपन्यांना दिले होते. प्रवाशांना बसेस ट्रॅक करता याव्यात यासाठी या सुविधा अॅपच्या माध्यमातून दिल्या जाणार होत्या. ऑगस्ट 2019 मध्ये तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ते अॅप्लिकेशन लाँच देखील केले. जे सहा महिन्यांत जनतेसाठी उपलब्ध होणे आवश्यक होते. परंतु ते काम पूर्ण झालेले नाही. याबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसटी नेमकी कधी येणार याची माहिती मिळणे अत्यंत गरजेचे असते. या सुविधेनंतर बसची स्थानकात, थांब्यावर येण्याची वेळ 24 तास आधीच समजणार आहे. याबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार एसटी लाईव्ह ट्रॅकींगचं हे अॅप पुढील महिन्यात ग्राहकांच्या सेवेत येणार आहे. तर पुढील दोन महिन्यांत सर्व बसेसमध्ये जीपीएस प्रणाली बसवली जाईल.

असं कळणार लोकेशन:
एसटीच्या प्रवाशांनी काढलेल्या तिकीटावर एक ट्रीप कोड असणार आहे. एसटीच्या अॅप्लिकेशनमध्ये तो ट्रॅक कोड टाकल्यावर
तिचे लोकेशन समजणार आहे. त्यामध्ये इतर मार्गावरील गाड्या, त्यांची वेळ, त्या सर्व गाड्यांचे थांबे देखील समजणार आहेत, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एसटीच्या मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयात अद्ययावत नियंत्रण कक्ष स्थापन केला जाणार आहे, याद्वारे राज्यभरात नियंत्रण ठेवले जाईल.