Heatwave : उष्णतेचे सगळे रेकॉर्ड मोडीत निघणार? एप्रिल- मे महिन्यात महाराष्ट्र तापणार!

राज्यात उष्णतेचे सगळे रेकॉर्ड मोडीत निघण्याची चिन्हं सध्या दिसत आहेत...यंदा सार्वकालिक उच्चांकी तापमान मे महिन्यात पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई: तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे. महाराष्ट्रात सध्या तापमानाचा कहर पाहायला मिळतोय. उत्तर आणि पश्चिम भारतावर सध्या सूर्य कोपल्याचं चित्र आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उष्णतेच्या लाटेने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. दुपारी बाजारपेठा आणि रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे. हे वर्ष खरंच सर्वाधिक हॉट ठरेल का? असा प्रश्न आता काही जण उपस्थित करताना दिसत आहेत.

महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांत सूर्य आग ओकतोय. या भागात तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे. अजून तर मे महिना जायचा आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष हे सर्वात उष्ण ठरणार का? असा सवाल विचारला जात आहे. गेल्यावर्षापेक्षा यंदा जास्त ऊन पडलं तर काय होईल, याची भीती नागरिकांना सतावत आहे. देशात 1901 नंतर वर्ष 2024 मध्ये उष्णतेने नवनवीन रेकॉर्ड केले होते. यंदा तर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच भीषण उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा 2025 हे सर्वात हॉट ठरेल का? याची चर्चा होत आहे.

मे महिना अधिक धोक्याचा?

भारतातील अनेक शहरात सध्या तापमानाचा पारा वाढलेला आहे. महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, जळगाव, संभाजीनगर, अकोला, वर्धा या शहरांत भीषण ऊन आणि दमट वातावरणामुळे अनेक भागात  घरातून बाहेर पडणे अवघड झाले आहे. जर एप्रिल महिन्यात ही अवस्था असेल तर मे महिन्यात या पेक्षा भीषण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यातल पारा  45 अंशांचा पार गेलाय. तर मुंबईत पारा 35 अंशांच्या घरात पोहचला आहे.  त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे.

अशी घ्या उष्माघातापासून काळजी:

उष्माघातापासून स्वत:चा बचाव करणं अत्यंत गरजेच आहे. त्यासाठी काम असेल तर उन्हात बाहेर पडावे. पाणी भरपूर प्रमाणात प्यावे. अंगावर ऊन्हाळा ऋतुला पोषक असतील अशा स्वरूपाचेच कपडे परिधान करावे. थंड पेय घ्यावीत. तसेच ऊन्हातून आल्यानंतर उलटी अथवा ताप अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेत योग्य ते उपचार घ्यावेत.

ग्रामीण भागात पाणी टंचाई

ग्रामीण भागात दुष्काळी पट्ट्यातील मराठवाडा, सोलापूर, सातारा जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्याने तलाव, धरणातील पाणी साठ्याचे बाष्पीभवन झाले आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. विहिरी, कूप नलिका कोरड्या पडल्या आहेत. तर नदी नाले तर कधीच कोरडेठाक पडले आहेत. शेतीच्या आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न बिकट होत आहे. बहुतांश भागांत टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सध्या सुरू आहे.

 


About Author

Rohit Shinde

Other Latest News