Heatwave Sunstroke: महाराष्ट्र तापला, उष्माघाताचा धोका वाढला!

राज्यात ऊन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे, उष्माघाताने लोकांचे बळी जात आहेत...

मुंबई: महाराष्ट्रात तापमानाचा पारा 40 ते 45 अंशांच्या घरात जाऊन पोहोचला आहे. परिणामी उष्माघाताचा धोका देखील वाढला आहे. उष्माघाताने एका 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना देखील समोर आली आहे.

उष्माघाताचा पहिला बळी, 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यात 11 वर्षीय संस्कार सोनटक्के या विद्यार्थ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. वाढत्या उष्णतेमुळे महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानात मोठी वाढ झाली आहे. चंद्रपूर आणि मालेगाव येथे 40 अंशांपेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले आहे. संस्कार सोनटक्के हा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील गजानन महाराज शाळेत शिकत होता. तो इयत्ता सहावीत होता. संस्कारला उन्हाचा त्रास झाल्याने त्याची तब्येत बिघडली. यानंतर त्याला उपचारासाठी अकोल्यातील रुग्णालयात घेऊन जात होते. मात्र वाटेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात उष्मघाताचा पहिला बळी गेला आहे. बुलढाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून त्याचा थेट फटका हा शाळकरी विद्यार्थ्यांना बसला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातही तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. चंद्रपुरात 40.6 अंश सेल्सियसपर्यंत तापमान पोहोचले आहे. मालेगाव शहर आणि तालुक्यातही उष्णतेची लाट पसरली आहे. मालेगावातील तापमानाने 43.2 अंशांचा आकडा पार केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस अधिक उष्णता जाणवणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांना उष्माघाताचा त्रास झाल्यास तातडीने उपचार मिळावेत यासाठी मालेगाव सामान्य रुग्णालयात 10 खाटांचा उष्माघात कक्ष तयार करण्यात आला आहे.

अशी घ्या काळजी:

संतुलित आहार

गरमीमुळे शरीरातील उष्णता वाढते. म्हणून या दिवसात शरीराला थंडावा मिळणं अत्यंत गरजेच असतं, म्हणून योग्य आहार घेणं महत्त्वाचं आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे या दिवसात तेलकट आणि तिखट पदार्थ खाणं टाळा. दुपारीच्या जेवणात काकडी,दही,ताक, लस्सी आणि फळांचा ज्युस पिणं फायदेशीर ठरतं. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी जिऱ्याचं किंवा धन्याचं पाणी पिणं फायदेशीर ठरतं. या दिवसांमध्ये अनेकांना युरीनरी इंफेक्शन होतं म्हणूनत रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही सब्जाचं पाणी प्यायल्याने किडनी संबंधित आजार दूर होतात.  प्रचंड ऊन असल्याने दिवसभरात तीन ते चार लीटर पाणी पिणं शरीरासाठी आवश्यक आहे.

त्वचेची काळजी घ्या

कडकडीत ऊन असल्याने घामामुळे त्वचारोग होण्याची शक्यता दाट असते. म्हणून विशेष काळजी घ्यावी लागते. शक्य झाल्यास दिवसातून दोनदा थंड पाण्याने स्वच्छ अंघोळ करा. त्वचारोग होऊ नये यासाठी तुम्ही अंघोळीच्या पाण्यात दोन ते तीन थेंब कापूर किंवा नीलगिरीचं तेल टाकू शकता. तसंच रात्री झोपताना स्वच्छ आणि मोकळे कपडे वापरा. शक्यतो या दिवसात झिन्स किंवा जाडसर कपडे वापरणं टाळावं. यामुळे शरीराचे होणार बरेच नुकसान टाळता येते.

शरीर थंड ठेवा

या दिवसात शरीराला हायड्रेटेड ठेवणं महत्त्वाचं आहे. उपवास आणि वातावरणातील वाढत जाणाऱ्या तापमानामुळे अशक्तपणा येण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच या दिवसात नारळपाणी पिणं फायदेशीर ठरतं. नारळपाण्यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. तसंच अशक्तपणा आणि पित्त वाढू नये यासाठी तुम्ही दिवसातून दोनवेळा नारळपाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं आहे.

 


About Author

Rohit Shinde

Other Latest News