पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती तनिषा भिसे यांना उपचारासाठी 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने आपल्या अहवालामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दोषी ठरवले आहे. चौकशी समितीचा अहवाल जाहीर होताच तनिषा उपचारासाठी ज्या डाॅ. सुश्रुत घैसासांकडे गेली होती. त्यांनी मंगेश दीनानाथ मंगेशकरमधून राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे.

घैसास यांनी आपल्या राजीनामा रुग्णालयाच्या प्रशासनाकडे सुपूर्द केला आहे. हॉस्पिटल प्रशासनाची होणारी बदनामी आणि रुग्णांची होणारी गैरसोय पाहता आपण राजीनामा देत असल्याचे घैसास यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे. विशेष म्हणजे डॉ सुश्रुत घैसास यांच्यावर भिसे कुटुंबाकडून 10 लाख रुपये अनामत रक्कम मागण्याचा आरोप केला होता.
दरम्यान, आरोग्य विभागाच्या चौकशीत अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दोषी ठरवल्याबाबत रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. धनंजय केळकर यांना पत्रकार परिषदेमध्ये विचारले असता ते म्हणाले, आम्हाला अजून शासनाचा अहवाल मिळालेला नाही. अहवाल मिळाल्यानंतर आम्ही याबाबत मत व्यक्त करू.
रुग्णालयात डिपाॅझिट मागण्याची पद्धत नाही
डॉ. धनंजय केळकर यांनी सांगितले की, रुग्णालयात डाॅक्टरांनी डिपाॅझिट मागण्याची पद्धत नाही. मी आणि माझ्यासोबतच्या डाॅक्टरांनी किती तरी शस्त्रक्रिया केल्या आहेत मात्र आम्ही कधीच डिपाॅझिटची रक्कम मागितली नाही. आम्ही रुग्णाला जो पेपर देतो त्यामध्ये देखील त्याचा उल्लेख नाही. मात्र, त्या दिवशी डाॅ. घैसास यांच्या डोक्यात काय आले काय माहिती त्यांनी केसपेपवर गोल करून डिपाॅझिटची रक्कम लिहिली.
दोषींना सोडणार नाही
रुग्णालय दोषी आहे, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितले तसेच दोषींना पाठीशी घातले जाणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. त्या म्हणाल्या, तनिषा सकाळी 9 वाजता रुग्णालयात गेली. तिला रक्तस्त्राव होत असताना तब्बल साडेपाच तास थांबवून ठेवण्यात आले. डिपाॅझिटची रक्कम मागून उपचार देखील नाकारण्यात आले. आरोग्य विभागाने नेमलेले समितीचा अहवालात रुग्णालय दोषी असल्याचे स्पष्ट दिले आहे. हे माता मृत्यूचे प्रकरण असल्याने अजून दोन समित्यांमार्फत याची चौकशी सुरू आहे. त्याचा अहवाल देखील लवकरच येईल.