IND vs ENG Test : इंग्लंडने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी १४ जणांचा संघ जाहीर केला आहे. 5 कसोटी सामन्यांची मालिका २० जूनपासून सुरू होत आहे. या संघात जेमी ओव्हरटन याने तीन वर्षांनी इंग्लंड संघात पुनरागमन केले आहे. त्याने २०२२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळला होता. बेन स्टोक्स इंग्लिश संघाचे नेतृत्व करणार आहेत, तर ब्रायडेन कार्स देखील संघात परतला आहे.
जेकब बेथेल आणि ख्रिस वोक्स यांचीही इंग्लंड संघात निवड
भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी जेकब बेथेल आणि ख्रिस वोक्स यांचीही इंग्लंड संघात निवड झाली आहे. या दोघांनीही गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये इंग्लंडसाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. दुखापतीमुळे वोक्स आणि कार्स झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी होऊ शकले नाहीत. गेल्या महिन्यात झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी सामन्यात दुखापतीनंतर गस अॅटकिन्सन संघाबाहेर झाला आहे.
फलंदाजीचा भार जो रूट, झॅक क्रॉली आणि ऑली पोप यांच्यावर असेल. शोएब बशीर, जेकब बेथेल आणि जेमी स्मिथ सारख्या तरुणांना संघात स्थान मिळाले आहे. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज सॅम कुक देखील त्याच्या धारदार गोलंदाजीने कहर करण्यासाठी सज्ज आहे.

दोन्ही संघांसाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची सुरुवात असेल
दोन्ही संघांसाठी ही मालिका २०२५-२७ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची सुरुवात असेल. रोहित शर्माच्या कसोटी निवृत्तीनंतर शुभमन गिलला भारताचा नवा कसोटी कर्णधार घोषित करण्यात आले आहे. त्याच वेळी, विराट कोहलीनेही लाल चेंडूच्या स्वरूपाला निरोप दिला आहे. यावेळी तरुण नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ: बेन स्टोक्स (कर्णधार), शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, जॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, ख्रिस वोक्स.