ईपीएफओ सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तर आता ईपीएफओने आगाऊ दाव्यांसाठी ऑटो-सेटलमेंट मर्यादा 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केली आहे. सदस्यांना जलद आर्थिक मदत देण्यासाठी ईपीएफओने कोविड-19 दरम्यान प्रथमच आगाऊ दाव्यांचे ऑटो-सेटलमेंट सुरू केले होते. आता भारत सरकारने आगाऊ दाव्याची रक्कम वाढवून PF खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे. यामुळे खासगी नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत वाढ
EPFO ने ऑटो सेटलमेंटची मर्यादा 1 लाख रुपयांवरून 5,00,000 रुपये केली आहे. म्हणजे आता EPFO सदस्य कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत आगाऊ दावा करून 5 लाख रुपयांपर्यंत आपोआप पीएफ जमा ठेवी काढू शकतात, म्हणजेच आता एवढी मोठी रक्कम काढण्यासाठी मॅन्युअल पडताळणीची आवश्यकता राहणार नाही. अशाप्रकारे यापुढे आता सरकारच्या या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांना 4 लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त फायदा होऊ शकेल.

कर्मचाऱ्यांना कसा फायदा होणार?
या सुविधेअंतर्गत, आता सदस्य मॅन्युअल पडताळणीशिवाय त्यांच्या PF खात्यातून सहजपणे 5 लाख रुपयांपर्यंत पैसे काढू शकतील. आधी ही मर्यादा फक्त 1 लाख रुपये होती आणि त्यापेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी मॅन्युअल पडताळणी आवश्यक होती, ज्यामुळे दावे निकाली काढायच्या प्रक्रियेला बराच वेळ लागायचा. त्यामुळे कोट्यवधी सदस्यांची समस्या लक्षात घेऊन आता 100000 रुपयांची मर्यादा 500000 रुपयेपर्यंत वाढवली आहे.
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी जाहीर केलेल्या या बदलामुळे तात्काळ आर्थिक मदतीची आवश्यकता असलेल्या कामगारांना अखंड आणि वेळेवर मदत मिळू शकेल. एखाद्याला वैद्यकीय खर्च किंवा घराच्या नूतनीकरणासाठी पैशांची आवश्यकता असेल तर आता आपोआप 1 ते 5 लाख रुपये काढू शकतील. EPF पैसे काढण्यासाठी सदस्यांकडे सक्रिय आणि केवायसी-लिंक्ड UAN असणे आवश्यक आहे. तसेच 50 हजारांपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी आधार कार्डसह पॅन कार्ड आवश्यक आहे. ईपीएफ रेकॉर्डमध्ये नोंदवलेले बँक खाते तपशील, रद्द केलेले चेक, फॉर्म 31, 19, 10C आवश्यक असेल. त्यामुळे तुम्ही देखील मेंबर असाल तर याचा फायदा घेऊ शकता.