छत्तीसगड सीमेवरील दुर्गम कवंडे गावात 12 कुख्यात नक्षल्यांची शस्त्रांसह शरणागती, मुख्यमंत्र्यांची सामूहिक विवाह सोहळ्यास उपस्थिती

गेल्या दीड वर्षांत 28 माओवाद्यांना मारले, 31 माओवाद्यांना अटक झाली, तर 44 लोकांनी आत्मसमर्पण केले. हा एक नवीन रेकॉर्ड आहे. ज्यांच्यावर खूप मोठ्या रकमेची बक्षीसं होती, असेही अनेक आता माओवाद सोडून सामान्य जीवनात परत येत आहेत.

Devendra Fadnavis – आज महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कवंडे या दुर्गम गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केला. या अतिदुर्गम आणि नक्षलप्रभावित भागात पोहचणारे ते राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज कोट्यवधींचे बक्षीस असलेल्या 12 नक्षलवाद्यांनी शस्त्रांसह शरणागती पत्करली. शस्त्रांसह शरणागती पत्करणारे अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. तसेच जिल्हा नियोजन विकास निधीतून 19 चारचाकी वाहने खरेदी करण्यात आली आहेत. त्यातील काही बुलेटप्रुफ वाहने आहेत. त्यांच्या चाव्या त्यांनी आज पोलीस दलाकडे सुपूर्द केल्या.

सामूहिक विवाह सोहळ्यासही उपस्थिती…

दरम्यान, यापूर्वी शरणागती पत्करलेल्या 13 पूर्वाश्रमीच्या नक्षल्यांचा आज एक सामूहिक विवाह सोहळाही गडचिरोलीत आयोजित करण्यात आला होता. त्याला हजेरी लावत त्यांनी नवदाम्पत्यांना नवजीवनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेय यावेळी सायंकाळी त्यांनी सी-60 जवानांचा सत्कार केला आणि त्यांना अत्याधुनिक अशी एके-103 शस्त्रे आणि एएसएमआय पिस्तुल, बुलेटप्रुफ जॅकेट्स प्रदान केली. त्यांच्या शौर्याची प्रशंसाही आणि कौतूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. आपल्या पोलीस दलाने अवघ्या 24 तासात कवंडे आऊटपोस्टचे निर्माण केले. हे केवळ पोलिस ठाणे नाही, तर शासन प्रशासन जनतेपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम आहे.

नक्षलग्रस्त भागात परिवर्तनाचे वारे…

शासन आणि प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून नक्षलग्रस्त भागात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे. गडचिरोलीला नक्षलमुक्त व औद्योगिकदृष्ट्या सक्षम जिल्हा बनवण्याचा आमचा निर्धार आहे. शासनाच्या सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचत असल्यामुळे लोकांमध्ये शासनाबाबतचा विश्वास वाढला आहे. हीच खरी लोकाभिमुख विकास प्रक्रिया आहे. कवंडे, नेलगुंडा आणि पेनगुंडा या ठिकाणी नुकतीच ‘धरती आबा’ अभियानांतर्गत शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमध्ये एकूण 533 लाभार्थ्यांना विविध योजनांचे 987 लाभ वितरित करण्यात आले.


About Author

Astha Sutar

Other Latest News