Om Birla : देशाच्या, राज्याच्या विकासासाठी अंदाज समितीची काम आणि भूमिका महत्वाची असते. देशाच्या संसदीय लोकशाही रचनेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या अंदाज समितीचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. हे अमृत महोत्सवी वर्ष संसदीय लोकशाहीतील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सुशासनाच्या मूल्यांचा गौरव करण्याची संधी आहे. असे गौरवोद्वगार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्रात काढले. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित देशभरातील अंदाज समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
समितीचे सार्वजनिक निधीच्या योग्य वापरावर लक्ष
दरम्यान, समितीने आतापर्यंत एक हजार पेक्षा अधिक अहवाल सादर करून शिक्षण, आरोग्य, संरक्षण, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या आहेत. समितीने केलेल्या शिफारशी देशाचे धोरण ठरविताना अत्यंत महत्वपूर्ण ठरत आहेत. १० एप्रिल १९५० रोजी स्थापन झालेली संसदेची अंदाज समिती सार्वजनिक निधीच्या योग्य वापरावर लक्ष ठेवत आहे. असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले. विशेष म्हणजे, १७ व्या लोकसभेत सादर झालेल्या ‘इलेक्ट्रिक वाहन धोरण’ अहवालामुळे केंद्र सरकारने ईव्ही (इलेक्ट्रॉनिक वाहने) वरील कर सवलती आणि रस्ता कर माफीसारख्या निर्णयांची अंमलबजावणीसुद्धा केली आहे.

समितीकडून खर्चाचे प्रभावी परीक्षण…
दुसरीकडे प्रगत तंत्रज्ञानाच्या वापराने या समित्यांची विश्लेषण क्षमता वाढवणे, सदस्यांचे कौशल्यवर्धन करणे आणि जनतेशी अधिक सुसंवाद साधणे या गोष्टी भविष्यातील कार्यासाठी आवश्यक आहेत. संसदेतील आणि राज्य विधानमंडळांतील अंदाज समित्यांनी सार्वजनिक खर्चाचे प्रभावी परीक्षण करत प्रशासनाला कार्यक्षम आणि जनतेला जबाबदार बनवले आहे. समितीने भारतीय रेल्वेसारख्या क्षेत्रातील धोरणात्मक सुधारणा, शासकीय सचिवालयाच्या पुनर्रचनेसारख्या शिफारशी आणि लोकसेवांमधील परिणामकारकता वाढवणारे निर्णय यावर उल्लेखनीय कार्य असल्याचेही बिर्ला यांनी यावेळी स्पष्ट केले.