11th online admission : गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार या प्रक्रियेत गुरुवारी अंतिम मुदतीपर्यंत एकूण 12 लाख 71 हजार 295 विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. अशी माहिती प्र.संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. श्रीराम पानझाडे यांनी दिली आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला असंही शालेय शिक्षण विभागाने म्हटलं आहे.
शून्य फेरी गुणवत्ता यादी 8 जून रोजी जाहीर…
दरम्यान, दिनांक 26 मे ते 5 जून 2025 या कालावधीत https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर विद्यार्थी नोंदणी करण्यात आली. या प्रक्रियेसाठी राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय/ उच्च माध्यमिक शाळांची पहिल्या फेरीमध्ये 9,435 नोंदणी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये एकूण विद्यार्थी प्रवेश क्षमता 21,23,040 इतकी असून त्यापैकी कॅप फेरीसाठी प्रवेश क्षमता 18,97,526 तर कोटा प्रवेश क्षमता 2,25,514 इतकी आहे. यामध्ये 1215190 विद्यार्थ्यांनी नोंदणी (रजिस्ट्रेशन) शुल्क ऑनलाईन जमा केलेले आहे. 12,05,162 विद्यार्थ्यानी अर्ज भाग-1 भरलेले आहेत. वेळापत्रकानुसार शून्य फेरी गुणवत्ता यादी 8 जून 2025 रोजी जाहीर होणार असून दिनांक 9 जून ते 11 जून 2025 या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश होणार आहेत.

कॅप फेरीची गुणवत्ता यादी 10 जूनला जाहीर…
दुसरीकडे इनहाऊस कोटा साठी 64,238 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. व्यवस्थापन (मॅनेटमेंट) कोटासाठी 32,721 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. अल्पसंख्याक (मायनॉरिटी) कोटासाठी 47,578 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. तर अर्ज भाग-2 भरुन अंतिम करुन 11,29,924 विद्यार्थ्यांनी लॉक केलेले आहेत. नियमित फेरी (कॅप राऊंड) साठी 11,29,932 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. तसेच कॅप फेरीची गुणवत्ता यादी 10 जून 2025 रोजी जाहीर होणार असून दिनांक 11 जून ते 18 जून 2025 या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश होणार आहेत.