मुंबई: लोकल ट्रेन ही मुंबईची जीवन वाहिनी आहे. मुंबईकरांच्या अवघं आयुष्य या लोकन ट्रेनशी निगडीत आहे. आता ऐन ऊन्हाळ्यात मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण सामान्य लोकल गाड्यांच्या दिमतीला आता वातानुकुलित एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली जाणार आहे. तसेच आणखी काही नव्या एसी लोकल्स ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
एसी लोकलमुळे मुंबईकरांना दिलासा
उन्हाच्या काहिलीने त्रस्त असलेल्या लोकल प्रवाशांना मध्य रेल्वेने खुश खबर दिली आहे. एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्याच येणार आहेत. बुधवारी 16 एप्रिल म्हणजेच उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. मध्य रेल्वेवर तुर्तास सहा एसी लोकल्स आहेत.त्यापैकी 5 लोकल दिवसभरात 66 फेऱ्या पूर्ण करतात. एक लोकल देखभालीसाठी राखीव असते. प्रशासनाने त्यांच्या वापरात असलेली राखीव लोकल वापरात आणण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेतल्याने एसी लोकलची संख्या आता 7 होणार आहे. परिणामी फेऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे बुधवारपासून एसी लोकलच्या फेऱ्या 66 ऐवजी 80 होतील.

सीएसएमटी ते बदलापूर मार्गावर धावणार गाड्या
सीएसटी ते बदलापूर स्थानकादरम्यान या गाड्या चालवल्या जाणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. कल्याण, ठाणे भागातील प्रवाशांना याचा सर्वाधिक फायदा होईल.
नवीन नॉन एसी सेवा विद्यमान नॉन एसी लोकल गाड्यांच्या जागी चालवण्यात येतील, ज्यामुळे रोजच्या उपनगरीय सेवांची एकूण संख्या 1810 राहिल. या सेवा सोमवार ते शनिवार दरम्यान सुरू असणार आहेत. रविवारी मात्र याच जागेवर नॉन एसी लोकल धावतील.
असं असेल वेळापत्रक:
अप मार्गावर:
कल्याण – सीएसएमटी 07:34 सकाळी
बदलापूर – सीएसएमटी 10:42 सकाळी
ठाणे – सीएसएमटी 01:28 दुपारी
ठाणे – सीएसएमटी 03:36 दुपारी
ठाणे – सीएसएमटी 05:41 संध्याकाळी
ठाणे – सीएसएमटी 07:49 संध्याकाळी
बदलापूर -सीएसएमटी 11:04 रात्री
डाऊन मार्गावर:
विद्याविहार – कल्याण 06:26 सकाळी
सीएसएमटी – बदलापूर 09:09 सकाळी
सीएसएमटी – ठाणे 12:24 दुपारी
सीएसएमटी – ठाणे 02:29 दुपारी
सीएसएमटी – ठाणे 04:38 संध्याकाळी
सीएसएमटी – ठाणे 06:45 संध्याकाळी
सीएसएमटी – बदलापूर 09:08 रात्री